दूध उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:26 AM2021-05-20T04:26:27+5:302021-05-20T04:26:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून, आगामी काळात दूध उत्पादनात मोठी झेप घ्यायची आहे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून, आगामी काळात दूध उत्पादनात मोठी झेप घ्यायची आहे, यासाठी शेतकऱ्यांना दूध वाढीसाठी मार्गदर्शन करा, अशी सूचना ‘गोकुळ’ चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या.
‘गोकुळ’च्या नूतन संचालकांनी बुधवारी गडहिंग्लज, बिद्री, तावरेवाडी येथील चिलिंग सेंटरला भेट देऊन माहिती घेतली. संचालकांचे स्वागत डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी यांनी केले. संकलित होणा-या दुधाचा आढावा तसेच प्रत्येक विभागनिहाय कामकाजाची माहिती बिद्री सेंटरचे शाखाप्रमुख विजय कदम, गडहिंग्लज शाखाप्रमुख प्रकाश पाटील, तावरेवाडी शाखाप्रमुख चेंडके यांनी दिली. तसेच दूध संकलन, पशुवैद्यकीय सेवा, यासंदर्भात संघाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर सर्व संचालकानी चर्चा केली.
दूध उत्पादकांना दोन रुपये जादा देण्यासाठी दूध वाहतुकीसह खर्चात काटकसर करायची असून, याबाबत माहिती घेण्याचे आदेश अध्यक्ष विश्वास पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. आमदार राजेश पाटील, संचालक अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील–चुयेकर, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, अभिजित तायशेटे, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, किसन चौगले, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, महाबळेश्वर चौगले आदी उपस्थित होते.
शीतकरण केंद्रांत दूध वाढीची स्पर्धा
संघाला जास्तीत जास्त दूध पुरवठा होण्यासाठी शीतकरण केंद्रांतर्गत सर्वाधिक दूध पुरवठा व गुणवत्ता यावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी सांगितले.
फोटो ओळी : ‘गोकुळ’च्या नूतन संचालकांनी बुधवारी गडहिंग्लज चिलिंग सेंटरला भेट दिली. (फोटो-१९०५२०२१-कोल-गोकुळ)