‘सारथी’च्या उपकेंद्रातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:32+5:302021-06-29T04:17:32+5:30
या उपकेंद्रात ‘सारथी’च्यावतीने दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना सोमवारपासून काम सुरू केले. याठिकाणी ‘सारथी’चे निबंधक अशोक पाटील ...
या उपकेंद्रात ‘सारथी’च्यावतीने दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना सोमवारपासून काम सुरू केले. याठिकाणी ‘सारथी’चे निबंधक अशोक पाटील उपस्थित होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी उपकेंद्राला भेट दिली. त्यांनी या केंद्राच्या पुढील विस्ताराबाबत निबंधक अशोक पाटील यांच्यासमवेत चर्चा केली. मुळीक यांनी काही सूचनादेखील यावेळी केल्या. ‘सारथी’कडून युपीएससीची पूर्व आणि मुख्य परीक्षा, पोलीस भरती, आदींबाबत ऑनलाईन प्रशिक्षण, मार्गदर्शन करण्यात येत आहे. पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ३५ हजार रुपयांची फेलोशिप देण्याची योजनादेखील राबविली जाते. त्याबाबतची माहिती केंद्रात आलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आली. ‘सारथी’कडून विविध पाच कौशल्यांबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. या प्रशिक्षणाची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
फोटो (२८०६२०२१-कोल-सारथी उपकेंद्र सुरू) : कोल्हापुरात सोमवारपासून सारथी संस्थेच्या उपकेंद्रातील कामकाज सुरू झाले. येथील कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना ‘सारथी’च्या विविध योजना, उपक्रमांची माहिती देण्यात येत आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)