दोषी संचालक, कर्मचाऱ्यांना नोटिसा लागू

By admin | Published: March 25, 2015 11:56 PM2015-03-25T23:56:50+5:302015-03-26T00:02:24+5:30

शिवाजी बँक प्रकरण : लेखापरीक्षकांच्या कारवाईने सहकार बुडव्यांच्या डोळ्यात अंजन

Guilty directors, notices issued to employees | दोषी संचालक, कर्मचाऱ्यांना नोटिसा लागू

दोषी संचालक, कर्मचाऱ्यांना नोटिसा लागू

Next

प्रकाश चोथे -गडहिंग्लज गैरकारभार आणि गैरव्यवस्थापणामुळे अवसायानात येऊन आता नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ‘शिवाजी बँकेचे’ फेरलेखापरीक्षण सुरू आहे. लेखापरीक्षक तथा विभागीय सहनिबंधकांनी जबाबदार संचालक आणि कर्मचाऱ्यांना नोटिसा लागू केल्या आहेत. पण, काही ‘पोहचलेले’ संचालक सहकारमंत्र्यांच्या दारात पोहचले असून, ते फेरलेखापरीक्षणास स्थगिती मिळविणार की लेखापरीक्षकांची निर्भीड कारवाई सहकारबुडव्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन ठरणार याकडे आता जिल्ह्यातील सहकारक्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.
सहकार खात्याकडून १ एप्रिल १९९८ पासून ते ३१ मार्च २०१० अखेरचे फेरलेखापरीक्षण सुरू आहे. लेखापरीक्षक डी.ए. चौगुले यांनी सर्वच प्रकरणांच्या मुळापर्यंत जात संचालक आणि काही दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना नोटिसा लागू केल्या आहेत. रमाबाई आंबेडकर सहकारी सूतगिरणीच्या विविध खात्यांवरील अपहार, बोगस कर्जखात्यांद्वारे लाटलेले सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचे यंत्रमाग अनुदान, संस्था ठेवींवर लाखो रुपयांचे दिलेले जादाचे व्याज, डॉरमंट (डेड) सेव्हिंग खात्यावरील रकमा परस्पर अन्यत्र वर्ग करीत नंतर रोखीने उचललेल्या लाखोंच्या रकमा, मालमत्तेवरील बोजा कमी करणे अशा अनेक गंभीर प्रकरणांच्या मुळाशी जात लेखापरीक्षकांनी संचालक आणि संबंधित अधिकारी यांना खुलासा देण्यासंबंधी नोटिसा बजावल्या आहेत.
पण भ्रष्टाचाराच्या गर्तेत खोलवर बुडालेल्या संचालकांना खुलाशासाठी कोणतेच दार नसल्याने डायरेक्ट सहकारमंत्र्यांचे दारच ठोठावत त्यांनी ‘स्टे’साठी प्रयत्न सुरू केले आहेत. सुदैवाने चंद्रकांतदादा पाटील यांच्या रूपाने सहकारमंत्रिपद कोल्हापूरच्या वाट्याला आले आहे. आता ‘दादा’ नेमके डोळ्यात पाणी आणून आर्जव करणाऱ्या हजारो ठेवीदारांना दिलासा देत निव्वळ ‘शिवाजी’च नव्हे, तर राज्यातील सहकार बुडव्यांच्या डोळ्यात या निमित्ताने अंजन घालणार की त्यांनाच पाठीशी घालणार.. हे येणारा काळच ठरवेल..!


दोषींवर फौजदारी...?
कुणाचीही भीडभाड न ठेवता दोषी संचालक आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. तसेच सहकार खात्यामार्फत ८८ अन्वये रक्कम वसुलीची कारवाई होणार असल्याचे चौगुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Guilty directors, notices issued to employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.