दोषींवर कठोर कारवाई करणार

By Admin | Published: July 25, 2016 12:36 AM2016-07-25T00:36:29+5:302016-07-25T00:36:29+5:30

‘देवस्थान’ची जमीन गैरव्यवहार प्रकरण : जिल्हाधिकारी सैनी यांची माहिती

The guilty will take strict action | दोषींवर कठोर कारवाई करणार

दोषींवर कठोर कारवाई करणार

googlenewsNext

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या शेतजमीन गैरव्यवहाराची माहिती सचिव शुभांगी साठे यांच्याकडून आज, सोमवारी घेणार आहे. सुरू असलेल्या पोलिस चौकशीमध्ये जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी रविवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची शाहूवाडीत साडेचार हजार एकर शेतजमीन आहे. ‘सीआयडी’च्या भूखंड गैरव्यवहार चौकशीमध्ये शाहूवाडीपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या उदगिरी येथील एक हजार एकर शेतजमीन देवस्थानच्या सचिव शुभांगी साठे यांच्यासह समिती सदस्यांच्या समितीच्या लेटरपॅडवर बोगस सह्या व शिक्के मारून मुंबई व पेठवडगाव येथील दोन कंपन्यांच्या नावे चढविण्याचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हाधिकारी हे देवस्थान समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांना या अपहार प्रकरणासंबंधी आपण कोणती भूमिका घेणार आहात, असा प्रश्न विचारला असता त्यांनी हा प्रकार अतिशय भयानक आहे. यासंबंधी सचिव शुभांगी साठे यांच्याकडून सोमवारी माहिती घेतली जाईल. तपास सध्या कोणत्या स्तरावर आहे यासंबंधी पोलिसांनाही विचारणा केली जाईल. देवस्थानची जमीन हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, शेतजमीन घोटाळ्याच्या चौकशीचा फास काही सदस्य व कर्मचाऱ्यांभोवती आवळत जात असल्याने त्यांच्या पायांखालची वाळू सरकली आहे. या प्रकरणात कारवाईची चाहूल लागल्याचे लक्षात आल्यानंतर काहींनी आतापासूनच जामिनासाठी वकिलांशी सल्लामसलत सुरू केल्याची खासगीत चर्चा आहे. देवस्थानमधील जमिनीचे सात-बारा उतारे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्यासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांची मदत घेतली आहे. देवस्थानच्या शिक्क्यांचाही गैरवापर करण्यात आला आहे. त्याचे काही नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पोलिसांच्या चौकशीमधून मोठे रॅकेट लवकरच बाहेर येणार आहे.
सहायक निरीक्षकासह पंटरला अखेर अटक
पंचवीस हजार रुपयांचे लाच प्रकरण
कोल्हापूर : जप्त केलेल्या ट्रकचा ताबा देण्यासाठी ट्रकमालकाकडून पंचवीस हजार रुपये घेऊन पसार झालेल्या पंटरासह लाच प्रकरणात सहभागी असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क, हातकणंगले विभागाच्या सहायक दुय्यम निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रविवारी अटक केली. संशयित निरीक्षक शामराव ईश्वरा पाटील (वय ५४, रा. जयभवानी कॉलनी, फुलेवाडी) व पंटर संदीप शामराव खोत ऊर्फ चम्या (३१, रा. रंकाळा टॉवर) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणामुळे उत्पादन शुल्क विभागातील खाबूगिरी बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर-बंगलोर महामार्गावर सुमारे तीस लाख किमतीच्या गोवा बनावटीच्या देशी-विदेशी मद्याची वाहतूक करणारा ट्रक (एम.एच. ०४, ईएन ५२१०) दि. ३ मार्च २०१६ रोजी मुंबईला जात असताना राज्य उत्पादन शुल्क, हातकणंगले विभागाच्या भरारी पथकाने सांगली-शिरोली फाटा येथे अडवून मद्यासह ट्रक जप्त केला होता. हा ट्रकमालक पांचू हरभजन हरिजन (२४, रा. इतिलामपूर, ता. उत्तोरोला, जि. बलरामपूर - उत्तर प्रदेश, सध्या रा. भिवंडी)यांना ताब्यात देण्यासाठी कॉन्स्टेबल सुहास काशीनाथ शिरतोडे (३६, रा. धरती माता हौसिंग सोसायटी, विचारेमाळ) याला पंटराकडून पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. यावेळी त्याचा पंटर पैसे घेऊन पसार झाला होता.
तक्रारदारांशी झालेल्या मोबाईल संवादामध्ये या प्रकरणात येथील दुय्यम निरीक्षक शामराव पाटील याचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले. कॉन्स्टेबल शिरतोडे याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये पंटराचे नाव पुढे आले. त्यानुसार पथकाने रविवारी या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून २४ हजार५०० रुपये जप्त केले. आज, सोमवारी या दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक उदय आफळे यांनी दिली.
 

Web Title: The guilty will take strict action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.