जागतिक विक्रम-कोल्हापूरच्या प्रणवने चार मिनिटे पेलला गुडघ्यावर फुटबॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 06:39 PM2020-08-20T18:39:47+5:302020-08-20T18:48:35+5:30
कोल्हापूरच्या प्रणव भोपळे याने लाँगेस्ट टाईम बॅलन्सिंग अ फुटबॉल* ऑन नी या फ्री स्टाईल फुटबॉल प्रकारामध्ये जागतिक विक्रम नोंदविला. त्याने चार मिनिटे २७ सेकंदांपर्यंत फुटबॉल गुडघ्यावर पेलला.
कोल्हापूर : कोल्हापूरच्या प्रणव भोपळे याने लाँगेस्ट टाईम बॅलन्सिंग अ फुटबॉल ऑन नी या फ्री स्टाईल फुटबॉल प्रकारामध्ये जागतिक विक्रम नोंदविला. त्याने चार मिनिटे २७ सेकंदांपर्यंत फुटबॉल गुडघ्यावर पेलला. यापूर्वी बांगलादेशच्या कोनोक कर्माकर याच्या नावावर या जागतिक विक्रमाची नोंद होती. त्याने चार मिनिटे ६ सेकंदांपर्यंत चेंडू पेलला होता. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि. १५) सायंकाळी पाच वाजता सावली केअर सेंटरमध्ये हा विक्रम प्रस्थापित केला. यासाठी त्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार अधिकृत साक्षीदार म्हणून करवीर तालुका क्रीडाधिकारी सचिन चव्हाण यांनी, तर टाईमकिपर म्हणून शिवानंद पूयम यांनी काम पाहिले. या विक्रमाची नोंद व चित्रीकरण संकेत रणदिवे व सावलीचे किशोर देशपांडे आणि सर्व सहकाऱ्यांचे सहाय्य त्याला लाभले.
प्रणव गेल्या दीड वर्षांपासून हा विक्रम मोडण्याचा सराव करत होता. कोल्हापूरमध्ये हा क्रीडा प्रकार पूर्णपणे नवीन असल्याने त्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षक उपलब्ध झाला नाही. त्याने गुगल, युट्यूबच्या सहाय्याने विविध माहिती गोळा करून एकलव्यासारखा आपला सराव सुरू ठेवला होता. प्रणवच्या आई-वडील आणि मोठा भाऊ यांच्यासह प्रसिद्ध फुटबॉलपटू अनिकेत जाधव याने त्याला वेळोवेळी प्रेरणा दिली
सराव करताना प्रणवला काही अडचणींना तोंड द्यावे लागले. यासाठी ह्यसावली केअर सेंटरह्ण ने सुरू केलेल्या ह्यद ब्रीजह्ण या उपक्रमाबद्दल माहिती मिळाली. संस्थेला भेट देत असताना त्याला ह्यब्रीजह्णमध्ये स्पोर्टस् फिजिओथेरपिस्ट, हायड्रो थेरपी, सायकॉलॉजिस्ट आणि न्यूट्रिशनिस्ट यांची उपलब्धता असल्याचे त्याला कळले.
एकाच छताखाली या सर्व सुविधा मिळाल्या. संस्थेचे डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी यांनी त्याचा स्टॅमिना बिल्डिंग, लोअर लिंब/कोअर मसल्स डेव्हलपमेंट, श्वासावर नियंत्रण आदी बाबींचा व्यायाम व सराव घेतला. ब्रीजच्या आहारतज्ज्ञ डॉ. विद्या कुलकर्णी व डॉ. राजकुमारी नायडू यांची हायड्रो थेरपी, तर मानसशास्त्रज्ञ भूषण चव्हाण यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.