गुजरातमधील व्यापाऱ्यांप्रमाणे आता रस्त्यावर उतरा, अशोक चव्हाण यांचे आवाहन; व्यापारी-उद्योजकांशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 05:38 PM2017-12-01T17:38:45+5:302017-12-01T17:49:42+5:30
कोल्हापूर : तुमचे प्रश्नांना राज्य आणि केंद्राच्या पातळीवर वाचा फोडली जाईल. आम्ही तुमच्यासोबत आहोत. मात्र, यासह तुम्ही आता गुजरातमधील व्यापाऱ्यांप्रमाणे रस्त्यावर उतरावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कोल्हापुरातील उद्योजक, व्यापाऱ्यांना शुक्रवारी केले. येथील कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजतर्फे आयोजित व्यापारी-उद्योजक यांच्याशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. पॅव्हेलियन हॉटेलमधील कार्यक्रमास आमदार पतंगराव कदम, आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील प्रमुख उपस्थित होते.
कोल्हापूर : तुमचे प्रश्नांना राज्य आणि केंद्राच्या पातळीवर वाचा फोडली जाईल. आम्ही तुमच्यासोबत आहोत. मात्र, यासह तुम्ही आता गुजरातमधील व्यापाऱ्यांप्रमाणे रस्त्यावर उतरावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कोल्हापुरातील उद्योजक, व्यापाऱ्यांना शुक्रवारी केले.
येथील कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजतर्फे आयोजित व्यापारी-उद्योजक यांच्याशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. पॅव्हेलियन हॉटेलमधील कार्यक्रमास आमदार पतंगराव कदम, आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक, व्यापाऱ्यांच्या संघटनांनी आपल्या प्रश्नांचे निवेदन प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना दिले.
संघटनांचे अध्यक्ष, प्रतिनिधींनी या अनुषंगाने मुद्दे मांडले. यावर प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, भाजप सरकारच्या गेल्या तीन वर्षांमध्ये राज्यात काय घडले याचे दर्शन हे उद्योजक, व्यापाऱ्यांनी मांडलेल्या प्रश्न, समस्यांतून दिसते. आता काँग्रेसचे सरकार असते, तर हे प्रश्न एका दिवसात सोडविले असते. भाजप सरकारकडून उद्योजक, व्यापारीवर्गाची पिळवणूक सुरू आहे. त्यांचे प्रश्न सरकारला सोडविता आलेले नाहीत. अशीच स्थिती गुजरातमध्ये असल्याने त्याठिकाणी सरकारविरोधात व्यापारी रस्त्यावर उतरले.
आता महाराष्ट्रातील प्रश्न कठीण होत आहेत. ते लक्षात घेऊन उद्योजक, व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरावे. या लढ्यात आम्ही तुमच्यासोबत राहू, तुम्ही सांगाल ते केले जाईल. तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काँग्रेसचे खासदार, आमदार प्रयत्न करतील.
या कार्यक्रमात नयन प्रसादे, तौफिक मुल्लाणी, सुभाष जाधव, सदानंद कोरगांवकर यांनी उद्योजक-व्यापाऱ्यांच्या अडचणी मांडल्या. राजीव परिख, जयेश ओसवाल, सुरजितसिंग पवार, वैभव सावर्डेकर, सचिन शहा, शिवाजीराव पोवार, आदी उपस्थित होते. कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी स्वागत केले. माजी अध्यक्ष आनंद माने यांनी प्रास्ताविक केले. आमदार सतेज पाटील यांनी आभार मानले.
उद्योजक, व्यापाऱ्यांच्या अपेक्षा, मागणी
- ललित गांधी : देशाची आर्थिक घडी चांगली बसण्यासाठी उद्योजक-व्यापाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे.
- आनंद माने : नोटाबंदी, जीएसटीनंतर उद्योग, व्यापार क्षेत्रात अनिश्चितता आली आहे. ती दूर होण्यासाठी काँग्रेसकडून पाठपुरावा व्हावा.
- राजू पाटील (अध्यक्ष, स्मॅक) : मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमध्ये कोल्हापूरचा समावेश व्हावा. वीज दरवाढीचे संकट दूर करण्यासाठी प्रयत्न व्हावे.
- महेश यादव (अध्यक्ष, क्रिडाई कोल्हापूर) : ‘ड’वर्ग महापालिकेमधील नियमावली चुकांची दुरुस्ती, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न करावेत. आमचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडावेत.
- संजय शेटे (उपाध्यक्ष, केमिस्टस् असोसिएशन) : मुदतबाह्य औषधांबाबतचा मुद्दा निकालात काढण्यासाठी पाठपुरावा करावा.
- भरत ओसवाल (अध्यक्ष, जिल्हा सराफ संघ) : सोने-चांदी व्यावसायिकांबाबतचा एलबीटीचा मुद्दा निकालात काढण्यात यावा. कन्व्हेंशन सेंटर व्हावे.