मतदार नोंदणीची वेबसाईट झाली ‘गुल’, ‘हेल्पलाईन’ही बंद : कसबा बावड्यातील मुल्लाणी कुटुंबीयांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:09 AM2017-12-06T11:09:40+5:302017-12-06T11:17:49+5:30
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत आॅनलाईन मतदार नावनोंदणीचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. नोंदणीसाठी उपलब्ध करून दिलेली वेबसाईट ओपनच होत नाही तर ‘हेल्पलाईन’साठी असलेला १९५० हा टोल फ्री क्रमांकही बंद आहे. त्याचा फटका कसबा बावड्यातील मुल्लाणी कुटुंबियांना बसला आहे.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत आॅनलाईन मतदार नावनोंदणीचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. नोंदणीसाठी उपलब्ध करून दिलेली वेबसाईट ओपनच होत नाही तर ‘हेल्पलाईन’साठी असलेला १९५० हा टोल फ्री क्रमांकही बंद आहे. त्याचा फटका कसबा बावड्यातील मुल्लाणी कुटुंबियांना बसला आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून ३ आॅक्टोबर ते १५ डिसेंबर २०१७ या कालावधीत मतदार नोंदणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी आॅनलाईनचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
त्याचा संदर्भ घेत कसबा बावड्यातील नेजदार कॉलनी येथील झाकीर मुल्लाणी यांनी आपली मुलगी समरीन हिच्या मतदार यादीतील नावातील, जन्मतारखेतील व घरच्या पत्त्याच्या दुरुस्तीसाठी आपल्या मोबाईलवरुन वेबसाईटद्वारे प्रयत्न केला; परंतु ती ओपनच झाली नाही.
तब्बल दोन तास झाकीर मुल्लाणींसह त्यांची मुलगी व मुलानेही प्रयत्न केला परंतु त्याला यश आले नाही. त्यामुळे त्यांनी मदतीसाठी ‘हेल्पलाईन’साठी असलेला १९५० हा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तोही बंद होता.
त्यामुळे त्यांनी आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क साधला. त्यावर त्यांनी तुम्ही महानगरपालिकेच्या शिवाजी मार्केट येथील कार्यालयात जाऊन क्रमांक ८ चा फॉर्म भरून नावात, जन्मतारखेत व पत्त्यात दुरूस्ती करून घ्या, असे सांगितले.
जर या ठिकाणी जाऊनच दुरुस्ती करायची असेल तर मग वृत्तपत्रात जाहिरात देऊन आॅनलाईनद्वारे मतदार नोंदणी व दुरुस्ती करा, असे आवाहन का करण्यात येत आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.