अजित पवार, अशोक चव्हाणांच्या बंडानंतर खोक्यांची भाषा बंद का?; गुलाबराव पाटील यांचे तडाखेबंद भाषण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 12:06 PM2024-02-17T12:06:15+5:302024-02-17T12:07:17+5:30
'..तेव्हा संजय राऊत नावाचं कार्टून जन्माला आलं नव्हतं'
कोल्हापूर : आम्ही सत्तेतून बाहेर पडलो आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो. तेव्हा ५० खोके घेतल्याचा दिवसरात्र आराेप झाला. मग तुमच्यासोबत जे सत्तेत होते ते अजित पवार आणि अशोक चव्हाण भाजपसोबत आल्यावर खोक्यांची भाषा का बंद झाली? असा खडा सवाल विचारत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाअधिवेशनात ‘हाय व्होल्टेज’ भाषण केले. पाटील यांच्या या तडाखेबंद भाषणावेळी प्रचंड टाळ्या, शिट्ट्यांनी उपस्थितांनी त्यांना प्रतिसाद दिला.
पाटील म्हणाले, सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाणारे बाळासाहेबांचे हिंदुत्व होते. मात्र, काहींनी त्यांच्याबद्दल अपप्रचार केला. बाळासाहेबांनी सर्वसामान्य लोकांना मोठं केलं आहे. बाळासाहेबांनी स्वतः कधीही पद घेतलं नाही. राम मंदिर व्हावं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. ते स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंनी त्यांची विचारधारा स्वीकारून उठाव केला. ज्या काँग्रेसला शिव्या देण्यात आमचं आयुष्य गेलं. ज्या काँग्रेसने आमची बरबादी केली, खुनाचे गुन्हे दाखल केले, बाळासाहेबांच्या खऱ्या वारसदारांनी त्याच काँग्रेससोबत 'आय लव्ह यू' केलं.
पिल्लूच्या सभेला ५०० माणसं
आदित्य ठाकरे यांना टोला लगावताना पाटील म्हणाले, साहेबांचं पिल्लू काल जळगावला आले होते. त्यावेळी फक्त ५०० लोक होते. गर्दी तुमच्यामुळे होत नव्हती. आम्ही रक्ताचे पाणी करून ती जमवत होतो. आम्ही खेड्यातले वाघ तुमच्यासोबत होतो, म्हणून ती गर्दी होत होती.
हा सोट्या ४१ मतं घेणार आणि..
१९९२ ची घटना घडली, त्यावेळी आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बाप त्यावेळी जेलमध्ये होतो. तेव्हा संजय राऊत नावाचं कार्टून जन्माला आलं नव्हतं. आमची ४१ मते या सोट्यांनी घ्यायची आणि खासदार व्हायचं आणि रोज आमच्याच नावाने शिमगा करायचा. हिंमत असेल तर राजीनामा दे, अशा शब्दांत पाटील यांनी राऊत यांच्या हल्ला चढवला.