गणेशवाडीत तीन माणसांवर गुलाबशेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2017 12:35 AM2017-05-09T00:35:17+5:302017-05-09T00:35:17+5:30

मसाजी नरकेंनी केले शक्य : १० गुंठ्यांत ग्रीनहाऊस; महिन्याला सरासरी साठ हजारांचे उत्पन्न

Gulabsheti on three people in Ganeshwadi | गणेशवाडीत तीन माणसांवर गुलाबशेती

गणेशवाडीत तीन माणसांवर गुलाबशेती

googlenewsNext

अत्यल्प शेती, तीही माळरानाची. यात पारंपरिक शेती करत ऊस पिकविताना अपेक्षित आर्थिक व कौटुंबिक प्रगतीला वाव मिळेनासा झाल्यानंतर बँकेकडून १० लाख कर्ज घेऊन ग्रीनहाऊसमधील गुलाब शेतीतून महिन्याला साठ हजारांचा नफा मिळवता येतो हे गणेशवाडी (ता. करवीर) येथील मसाजी नरके यांनी दाखवून दिले आहे. नरके यांच्या या प्रयोगशील शेतीची दखल घेऊन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते त्यांना आयडियल फार्मर अवॉर्ड २०१५ प्रदान करण्यात आला.
स्वत:ची प्रयोगशीलता व कृषी तज्ज्ञांचे सल्ले घेऊन आपल्या दहा गुंठे जमिनीत २०१३ साली त्यांनी ग्रीनहाऊस उभे केले. या शेतीत सध्या तिघेजणच राबत असून कमी मनुष्यबळात, थोडेसे वेगळे व बाजाराचा कल लक्षात घेऊन शेती केल्यास ती फायदेशीर ठरते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
करवीर तालुक्याच्या पश्चिमेकडे डोंगरकपारीत असणारे गणेशवाडी गाव आहे. येथील मसाजी नरके यांना अत्यल्प शेती आहे. यातून कोणत्याच प्रगतीचा मार्ग नरके यांना दिसेना तेव्हा त्यांनी अनेक ठिकाणी ग्रीन हाऊसमध्ये जाऊन कमी क्षेत्रात जादा उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचा अभ्यास केला. यातून गुलाबाला नेहमीच प्रचंड मागणी असल्याचे लक्षात आल्यानंतर आपल्या दहा गुंठे जमिनीत गुलाब शेतीचा प्रयोग करण्याचा निर्धार केला. बॅँकेतून १० लाख कर्ज घेतले आणि ग्रीनहाऊस उभे केले.
लागण करण्यापूर्वी या दहा गुंठे क्षेत्रात २० गाड्या शेणखत पसरवून रोटरने ते जमिनीत एकजीव केले. यानंतर चार फुटांप्रमाणे बेड तयार करून या बेडवर लिंबोळी पेड, सुपर फॉस्फेट, पोटॅश, मायक्रोन्युट्रीन्स त्याचबरोबर मुळांची व रोपांची चांगली वाढ होण्यासाठी ह्युमिक अ‍ॅसिड ग्रॅन्यूएल्स म्हणून दिल्यानंतर या बेडवर ड्रीप आणि स्प्रिंकलर सिस्टीम बसवली. तत्पूर्वी शेडनेट तयार झाले होते. या तयार केलेल्या बेडवर ‘टॉप सिक्रेट’ जातीच्या गुलाबाची रोपे पुण्यावरून प्रती रोप ९ रुपयेप्रमाणे घेऊन साडेआठ हजार रोपांची लागण केली. बरोबर एक महिन्यानंतर वॉटर सोल्यूएबल खते ड्रीपमधून देण्यास सुरुवात केली. यामुळे मूळ धरलेल्या रोपांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली. पण, मुख्य रोपाचा सोट बेंडिंग केल्याशिवाय या रोपांच्या फुटव्यांना जोर लागत नाही, म्हणून प्रथम तो बेंड केला. यामुळे मुख्य रोपाच्या मुळापासूनच चांगले फुटवे येऊ लागले, असे नरके यांनी सांगितले. कृषितज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे फुले लागत
असतानाही पहिली तीन महिने उत्पादन घेण्याचे टाळले. त्यामुळे मुख्य रोपाचे सोट व फुटवे हाताच्या अंगठ्याच्या जाडीचे झाले. पानांची संख्या वाढली.
चार महिन्यांची टवटवीत आणि निर्यात योग्य गुलाब फुले मिळू लागली. बाजारात टॉप सिक्रेट जातीच्या फुलाचा आकार, रंग व तजेलदारपणा चांगला असल्याने दरामध्ये ३ रुपयांपासून पाच रुपयांपर्यंत प्रतिफूल दर मिळत आहे. प्रत्येक दिवशी फुलांची तोडणी करताना १० गुंठे क्षेत्रात किमान ५०० ते ६०० फुले मिळतात. किमान दीड ते दोन हजार रुपयांची फुले दरदिवशी कोल्हापूर मार्केटला १० फुलांचा एक बंच असे पॅकिंग करून पाठवितात. स्थानिकला हारासाठीही मोठ्या प्रमाणात गुलाबाला मागणी आहे. त्यामुळे गुलाब विक्रीतून महिन्याला सरासरी ६० ते ६५ हजार रुपये उत्पन्न असून, ही शेती घरच्या घरी केवळ तीन लोकांवर करत असल्याचे नरके यांनी सांगितले. यासाठी पत्नी प्रीताबाई यांची मोठी साथ आहे.
नरके म्हणाले, दर्जेदार गुलाबासाठी ग्रीनहाऊसमधील तापमानही फार महत्त्वाचे असते. किमान १७ सेल्सियस ते कमाल ३५ सेल्सियस रोपांची चांगली जोपासना होऊन उत्पन्नही चांगले मिळते. ढगाळ वातावरणात रोगांच्या प्रादुर्भावाला रोपे बळी पडतात. अशावेळी मोठी दक्षता घ्यावी लागते. विशेषत: उन्हाळ्यात रेडमाईटस (लाल कोळी), पावसाळ्यात डाऊनी व हिवाळ्यात भुरी रोगांचा प्रादुर्भाव होतो. पण दक्षता बाळगून दर दिवशीच्या निरीक्षणातून या रोगांपासून रोपांचे संरक्षण करता येते. विशेष म्हणजे फुटव्याच्या फुलांना बाजूला करून मुख्य गुलाबफुलांचा टवटवीत व तजेलदारपणा राखणे आवश्यक आहे. मुळांची, रोपांची वाढ गुलाब फुलासाठी महत्त्वाची असते. यासाठी ह्युमिक अ‍ॅसिड एक दिवसआड व १०० किलो गांडूळ खत प्रत्येक महिन्याला देणे गरजेचे असते.

Web Title: Gulabsheti on three people in Ganeshwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.