‘शिक्षक’, ‘पदवीधर’चा गुलाल उद्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:50 AM2020-12-05T04:50:55+5:302020-12-05T04:50:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी अत्यंत चुरशीने व अटीतटीने पहिल्यांदाच मतदान झाल्याने निकालाबाबत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी अत्यंत चुरशीने व अटीतटीने पहिल्यांदाच मतदान झाल्याने निकालाबाबत जिल्ह्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज, गुरुवारी सकाळी आठपासून पुणे येथे मतमोजणी होत आहे. उमेदवारांची संख्या, त्यात पसंती क्रमांकामुळे मतमोजणीला उशीर लागणार असून, गुलालासाठी उद्या, शुक्रवारची प्रतीक्षा उमेदवारांसह समर्थकांना करावी लागणार आहे.
पुणे पदवीधरसाठी यावेळेला ६२ जण रिंगणात होते. नोंदणीपासून मतदानापर्यंत येथे चुरस पाहावयास मिळाली. तब्बल २ लाख ४५ हजार २५५ मते झाली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक ६० हजार ९६४ मते नोंदली गेली. ‘शिक्षक’मध्ये ३५ जणांनी आपले नशीब आजमावले. येथे पहिल्यांदाच पक्षीय पातळीवर निवडणूक लढविली गेल्याने प्रचंड ईर्षा पाहावयास मिळाली. येथे ५२ हजार ७११ मते झाली असून, यामध्ये १० हजार ६०९ मते ही कोल्हापुरातील आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यात निवडणूक यंत्रणा राबविली होती. त्यामुळे येथे निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. त्यात ‘शिक्षक’मधून प्रा. जयंत आसगावकर हे स्थानिक उमेदवार असल्याने उत्कंठा ताणली आहे. आज सकाळपासून मतमोजणी सुरू होत असली तरी उमेदवारांची संख्या व पसंती क्रमांकांमुळे मोजणीस वेळ लागणार आहे. पहिल्या पसंतीची मते मोजण्यासाठी रात्री आठ वाजतील. साधारणता संपूर्ण निकाल लागण्यासाठी शुक्रवार उजाडणार हे निश्चित आहे.
पहिल्या पसंतीत कोटा अशक्यच
‘पदवीधर’साठी १ लाख २२ हजार ६२८, तर ‘शिक्षक’साठी २६ हजार ३५६ मतांचा कोटा आहे. मात्र, निवडणुकीतील चुरस व मतांसाठी लावलेल्या जोडण्या पाहता पहिल्या पसंतीत कोटा पूर्ण करताना दमछाक होणार आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत चौथ्या फेरीपर्यंत झुंजावे लागण्याची शक्यता आहे.
सामान्य माणसातही उत्सुकता
प्रचाराच्या निमित्ताने पहिल्यांदाच सामान्य माणूस थेट या निवडणूकीत सहभागी झाला होता. त्यामुळे निकालाविषयी सामान्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
- राजाराम लोंढे