कोल्हापूर जिल्ह्यात ६२ वर्षांत १४ अपक्षांना गुलाल, अपक्ष आमदारांची नावे.. जाणून घ्या
By पोपट केशव पवार | Published: October 22, 2024 12:43 PM2024-10-22T12:43:25+5:302024-10-22T12:43:38+5:30
पोपट पवार कोल्हापूर : निवडणुकीच्या राजकारणात पक्षाने तिकीट नाकारले तर अनेकजण स्वबळाच्या बेळकुंड्या फुगवून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात. ...
पोपट पवार
कोल्हापूर : निवडणुकीच्या राजकारणात पक्षाने तिकीट नाकारले तर अनेकजण स्वबळाच्या बेळकुंड्या फुगवून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या स्वबळाने भल्याभल्यांचे राजकारण कायमचे संपुष्टात आणल्याचा इतिहास आहे. काही ठराविक नेत्यांनी मात्र तत्कालीन परिस्थितीचा फायदा उठवत स्वबळावर गुलाल लावत राजकारणाची एक एक शिडी सर केली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात १९६२ पासून आजतागायतपर्यंत अशा १४ अपक्षांनी विधानसभेच्या रिंगणात यश मिळवले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत नेहमीच इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरी ठरलेली असते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात डझनभर अपक्ष आपले नशीब आजमावत असतात. कोणत्याही उमेदवाराला पक्षाचे पाठबळ असले की, त्याला दहा हत्तीचे बळ येते. निवडणूक प्रचार यंत्रणेपासून ते कार्यकर्त्यांपर्यंतची मदत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला नेहमीच मिळते.
शिवाय उमेदवारापेक्षाही पक्ष कोणता हे पाहून अनेकजण मतदान करत असतात. त्यामुळे पक्षाची उमेदवारी मिळणे म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखे आहे. पण यातूनही उमेदवारी न मिळाल्याने काहीजणांनी अपक्ष रिंगणात उतरून वादळात दिवा लावला आहे. ज्यांनी हे अपक्ष उभा राहून जिंकण्याची किमया साधली यातील बहुतांशजणांनी जिल्ह्याच्या राजकारणाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे सतेज पाटील, राजू शेट्टी, के. पी. पाटील, प्रकाश आवाडे यांनी अपक्ष उमेदवारी करत गुलाल अंगावर घेतला.
१९९५-२००४ ला तीन अपक्ष विधानसभेत
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत चंदगडमधून भरमूअण्णा पाटील, राधानगरीतून नामदेवराव भोईटे व शाहूवाडीतून संजयसिंह गायकवाड हे तिघे अपक्ष निवडून आले होते. भरमूअण्णांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा दिल्याने शेवटच्या सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. तर २००४ मध्येही करवीरमधून सतेज पाटील, भुदरगड-राधानगरीमधून के. पी. पाटील व शिरोळमधून राजू शेट्टी हे तिघे अपक्ष विधानसभेत गेले होते.
मंडलिक एकमेव अपक्ष खासदार
राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने सदाशिवराव मंडलिक यांनी २००९ मध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात अपक्ष उडी घेत विजय मिळवला होता. जिल्ह्याच्या इतिहासात ते एकमेव अपक्ष खासदार ठरले आहेत. राष्ट्रवादीचे तरुण उमेदवार संभाजीराजे यांचा त्यांनी पराभव केला.
हे आहेत अपक्ष जिंकलेले आमदार
उमेदवार - मतदारसंघ - साल
सदाशिवराव मंडलिक - कागल - १९७२
कृष्णाजी मोरे - राधानगरी - १९७२
विठ्ठलराव चव्हाण- पाटील (व्ही.के) - चंदगड - १९७८
विक्रमसिंह घाटगे - कागल - १९७८
यशवंत एकनाथ पाटील - पन्हाळा - १९८०
संजयसिंग गायकवाड - शाहूवाडी - १९८५
भरमूअण्णा पाटील - चंदगड - १९९५
संजयसिंग गायकवाड - शाहूवाडी - १९९५
नामदेवराव भोईटे - राधानगरी - १९९५
के. पी. पाटील - राधानगरी - २००४
सतेज पाटील - करवीर - २००४
राजू शेट्टी - शिरोळ - २००४
राजेंद्र पाटील-यड्रावकर - शिरोळ - २०१९
प्रकाश आवाडे - इचलकरंजी २०१९