गुंड स्वप्निल तहसीलदारचा वाढदिवस कार्यक्रम उधळला

By admin | Published: May 3, 2015 01:09 AM2015-05-03T01:09:10+5:302015-05-03T01:09:10+5:30

पोलिसांची कारवाई : समर्थकांवर लाठीमार; मैदानावरील मंडप काढला

Gund Swapnil tahsildar's birthday program was fired | गुंड स्वप्निल तहसीलदारचा वाढदिवस कार्यक्रम उधळला

गुंड स्वप्निल तहसीलदारचा वाढदिवस कार्यक्रम उधळला

Next

कोल्हापूर : पोलीस रेकॉर्डवरील गुंड व ‘एस.टी.’ गँगचा म्होरक्या स्वप्निल तहसीलदार याच्या वाढदिवसाचा कार्यक्रम शनिवारी पोलिसांनी उधळून लावला. मुक्त सैनिक वसाहत येथील मैदानावर विनापरवाना वाढदिवसाचा कार्यक्रम होणार असल्याचे कळताच शाहूपुरी पोलिसांनी तेथे जाऊन कारवाई करीत आलिशान मंडपासह इतर साहित्य काढून टाकले. शीघ्र कृती दलाच्या सशस्त्र जवानांसह दोनशे पोलीस या कारवाईत सहभागी झाले होते.
यानंतर रात्री मुस्कान लॉन येथे हा कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे समजताच पोलिसांनी रात्री साडेदहाच्या सुमारास तेथही जाऊन तहसीलदार समर्थकांना लाठीमार करीत पिटाळून लावले. यावेळी काहीजणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली.
पोलीस रेकॉर्डवरील ‘एस.टी.’ गँगचा म्होरक्या तहसीलदार याच्या वाढदिवसानिमित्त जंगी कार्यक्रमाचे आयोजन मुक्त सैनिक वसाहत येथील मैदानावर केले होते. या कार्यक्रमाच्या परवानगीसाठी तहसीलदार याने शाहूपुरी पोलिसांच्या गोपनीय विभागाकडे अर्ज केला होता; परंतु त्याला परवानगी नाकारण्यात आली होती. दरम्यान, परवानगी न घेता तहसीलदार याने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने निमंत्रणपत्रिकाही काढल्या. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार राजेश क्षीरसागर व संजय कदम यांना निमंत्रित केले होते, तर माजी नगरसेवक राजेंद्र डकरे, राजेंद्र कसबेकर, नगरसेवक रशिद बारगीर, अनिल आवळे, नंदू डकरे, प्रा. एकनाथ काटकर, सुनील काटकर, इकबाल शेख, मिलिंद धोंड आदींची निमंत्रणपत्रिकेत प्रमुख उपस्थितांमध्ये नावेही छापली होती. सकाळपासून येथील सृजन आनंद विद्यालयाच्या पाठीमागील मैदानावर भव्य मंडप व स्टेज उभे केले. सभोवताली प्रखर विद्युत रोषणाई, जनरेटर व डॉल्बीची व्यवस्था केली होती. या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी त्याचे समर्थक करीत होते.
दरम्यान, या घटनेची माहिती शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांना समजताच त्यांनी सायंकाळी सहाच्या सुमारास फौजफाट्यांसह धाव घेतली. यावेळी पोलिसांचा फौजफाटा पाहून समर्थक पळून गेले. शीघ्र कृती दलाच्या सुमारे ५० जवानांसह पोलिसांनी मंडपासह इतर साहित्य काढून टाकले. तहसीलदार याच्या घरी जाऊन त्याची चौकशी केली असता तो पसार झाल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत याठिकाणी पोलीस तळ ठोकून होते. या कारवाईची माहिती समजताच पाहुण्यांसह समर्थक फिरकलेच नाहीत, तर परिसरातील नागरिकांनी कारवाई पाहण्यासाठी मैदानाच्या बाहेर गर्दी केली होती.
दरम्यान, मुक्त सैनिक वसाहत मैदान येथील कार्यक्रम उधळल्यानंतर तहसीलदार समर्थकांनी पोलिसांना चकवा देत त्याच परिसरातील मुस्कान लॉन येथे वाढदिवस कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला. याची माहिती रात्री साडेदहाच्या दरम्यान शाहुपुरी पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच मुस्कान लॉन वर पोलिस फौजफाटा गेला. पोलिसांनी येथे उपस्थित असलेल्या तहसीलदार समर्थकांवर लाठीमार करीत त्यांना पिटाळून लावले. लॉनमध्ये रात्रीच्या वेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे बाहेर काही समजत नव्हते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस जमल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Gund Swapnil tahsildar's birthday program was fired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.