गुंड स्वप्नील तहसीलदार टोळीकडून दोघांवर सशस्त्र जीवघेणा हल्ला, तिघांना अटक

By उद्धव गोडसे | Published: September 13, 2023 04:38 PM2023-09-13T16:38:27+5:302023-09-13T16:38:45+5:30

यावेळी १५ ते २० जणांनी तलवारी, एडके नाचवत परिसरात दहशत माजवली

Gund Swapnil Tehsildar gang armed fatal attack on two, three arrested in kolhapur | गुंड स्वप्नील तहसीलदार टोळीकडून दोघांवर सशस्त्र जीवघेणा हल्ला, तिघांना अटक

गुंड स्वप्नील तहसीलदार टोळीकडून दोघांवर सशस्त्र जीवघेणा हल्ला, तिघांना अटक

googlenewsNext

कोल्हापूर : गुंड स्वप्नील तहसीलदार आणि त्याचा भाऊ सागर या दोघांसह त्यांच्या टोळीतील १५ ते २० जणांनी पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातून मुक्त सैनिक वसाहतीत सशस्त्र पाठलाग करून दोघांवर जीवघेणा हल्ला केला. मंगळवारी (दि. १२) रात्री साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान झालेल्या हल्ल्यात अभिषेक नामदेव पाटोळे (वय २३) आणि करण संजय बनसोडे (वय २५, दोघे रा. चांदणे नगर, रुईकर कॉलनी, कोल्हापूर) हे दोघे गंभीर जखमी झाले.

तलवारी नाचवत आणि पिस्तुलाचा धाक दाखवत गुंडांनी धुमाकूळ घातल्याने परिसरात कमालीची दहशत निर्माण झाली होती. याप्रकरणी गुंड स्वप्नील संजय तहसीलदार (वय ४५), सागर संजय तहसीलदार आणि अमित धोंदरे या तिघांना पोलिसांनी अटक केली.

शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक पाटोळे याने तीन वर्षांपूर्वी गुंड स्वप्नील तहसीलदार याच्या टोळीतील हेमंत नावाच्या तरुणाला मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून तहसीलदार टोळी अभिषेकच्या मागावर होती. मंगळवारी रात्री मुक्त सैनिक वसाहतीमधील वालावलकर हायस्कूलजवळ भावाच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने अभिषेक हा करण बनसोडे या मित्राला सोबत घेऊन पेट्रोल देण्यासाठी दुचाकीवरून गेला.

पेट्रोल दिल्यानंतर रस्त्याकडेला थांबलेला अभिषेक हा सागर तहसीलदार याच्या नजरेस पडला. त्याने भाऊ स्वप्नील याच्यासह इतरांना बोलवून घेतले. त्यांनी अभिषेक आणि करण या दोघांना जातीवाचक शिवीगाळ करीत काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर पळून जाणा-या दोघांचा पाठलाग करून मारले. यावेळी १५ ते २० जणांनी तलवारी, एडके नाचवत परिसरात दहशत माजवली.

माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवला. जखमी पाटोळे याच्या फिर्यादीनुसार गुंड तहसीलदार बंधूंसह १५ ते २० जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, दहशत माजवणे, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचा गैरवापर करणे आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बुधवारी सकाळी तिघांना अटक केली. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Gund Swapnil Tehsildar gang armed fatal attack on two, three arrested in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.