गुंडूराव कांबळेला पोलिस कोठडी
By admin | Published: February 7, 2017 11:56 PM2017-02-07T23:56:22+5:302017-02-07T23:56:22+5:30
विनयभंगप्रकरणी न्यायालयात हजर
चंदगड : कॉलेजमधील युवतींना अश्लील मेसेज आणि दोन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी निर्भया पथकाने चंदगड पोलिसांत दीड महिन्यापूर्वी प्रा. गुंडू कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. मात्र, तो दीड महिन्यापूर्वी फरार होता. मंगळवारी तो स्वत:हून चंदगड न्यायालयात हजर झाला. त्याला न्यायाधीश एम. डी. ठोंबरे यांनी १० फेब्रुवारीअखेर पोलिस कोठडी सुनावली.
अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्याने पहिला अर्ज गडहिंग्लज येथील न्यायालयात दाखल केले होता. मात्र, न्यायाधीश देशमुख यांनी तो फेटाळला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला अर्जही न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे कांबळे याला हजर झाल्याशिवाय पर्याय नसल्याने तो मंगळवारी चंदगड न्यायालयात हजर झाला.
कांबळे न्यायालयात हजर झाल्याची वार्ता तालुक्यात पसरताच लोकांचा संतप्त जमाव न्यायालयासमोर जमला. यावेळी कांबळे याच्याविरोधात निषेधाच्या घोषणा देऊन तोंडाला काळे फासण्याचा जमावाने प्रयत्न केला. मात्र, पोलिस बंदोबस्त मोठा असल्याने तो यशस्वी झाला नाही.जमाव पाटील यांच्या मागे लागल्याने पोलिसांनी त्याला अक्षरश: पळवतच पोलिस ठाण्यात नेले. (प्रतिनिधी)
चंदगड न्यायालयात पोलिस ठाण्याकडे आरोपी गुंडूराव कांबळे याला नेताना पोलिस.