जिल्ह्यातील आठ आमदारांकडे बंदूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 04:48 PM2022-01-07T16:48:29+5:302022-01-07T17:59:21+5:30
भीमगोंडा देसाई कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर वगळता जिल्ह्यातील ...
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर वगळता जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार बंदूकधारी आहेत. या सर्वांनी जिल्हा प्रशासनाकडून स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना घेतला आहे.
आमदार आणि खासदार म्हणून निवडणूक आल्यानंतर अनेकांनी प्राधान्याने बंदुकीचा परवाना मिळविला आहे. शिक्षक मतदारसंघातून आमदार झालेले जयंत आसगावर यांनीही पंधरा दिवसांपूर्वीच परवाना घेतला आहे. तिन्ही खासदारांकडेही बंदुकीचा परवाना आहे. काही आमदार, खासदार यांच्यासह त्यांचे वडील, भावानेही बंदुकीचा परवाना घेतला आहे.
बंदूक परवाना असलेले आमदार
सतेज पाटील
पालकमंत्री सतेज पाटील, आमदार सतेज पाटील विधान परिषदेचे आमदार आणि पालकमंत्री आहेत. ते काॅंग्रेसचे नेते आहेत.
ऋतुराज पाटील
ऋतुराज पाटील दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरून आमदार झाले आहेत.
पी. एन. पाटील
पी. एन. पाटील करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.
डॉ. विनय कोरे
डॉ. कोरे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. याशिवाय ते जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
राजूबाबा आवळे
आमदार आवळे हातकणंगले मतदारसंघाचे आमदार आहेत. ते काॅंग्रेस पक्षातून निवडून आले आहेत.
प्रकाश आवाडे
आमदार आवाडे इचलकरंजी मतदारसंघाचे आमदार आहेत. यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.
हे आहेत अपवाद...
कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शिरोळ मतदारसंघाचे आमदार, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर, चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्याकडे मात्र बंदुकीचा परवाना नाही.
तिन्ही खासदारांकडेही परवाना
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक, हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती यांच्याकडेही बंदुकीची परवाना आहे.
तुम्हालाही हवे शस्त्र..?
बंदूक परवान्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागतो, हा अर्ज पोलीस प्रशासनाकडे पाठवण्यात येतो. चौकशी करून पोलीस प्रमुखांकडे अहवाल दिला जातो. तो अहवाल जिल्हा पोलीस प्रमुखांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी येतो.