‘स्वाभिमानी’साठी गुंता!-
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2017 01:07 AM2017-01-24T01:07:10+5:302017-01-24T01:07:10+5:30
-शेट्टींना सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील : महाडिक अवमानामुळे संघटना भाजपपासून दोन हात दूर
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे महा-आघाडीसोबत राहतील, यासाठी आपण स्वत: त्यांना विनंती करणार असल्याची माहिती माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आपण ज्या ठिकाणी उभे राहतो ते स्वत:च्या ताकदीवर, तिथे कोणी मदत करावी, याची अपेक्षा कधीच करत नाही. मला विरोध केला तर तो सहन करेन, पण माझ्या विरोधाचा दणका कोणाला सोसणार नाही, अशा शब्दांत विरोधकांचा समाचार घेतला. मी आता आमदार नसलो तरी माझ्या शब्दाला वजन असल्याचेही त्यांनी सांगून टाकले.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेले जागा वाटप चांगले आहे. जिथे भाजपला अडचण आहे, त्या ठिकाणी ‘ताराराणी आघाडी उभी राहणार आहे. आम्ही भाजपसोबतच असून भाजपप्रणीतच ‘ताराराणी’ असल्याचे महाडिक यांनी सांगितले. शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघात ‘भाजता’आघाडीतील विनय कोरे आपल्या विरोधात आहेत, याबाबत आपण पालकमंत्री पाटील यांच्याकडे उघड नाराजी व्यक्त केल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर महाडिक म्हणाले, महाडिक कधी नाराजी व्यक्त करत नाही, स्वत:च्या ताकदीवर मैदानात उतरतो. कोणाकडून मदतीची अपेक्षा आम्ही करत नाही, जे उलटे जातील त्यांना निश्चित प्रायश्चित्त मिळेल. विधानपरिषद निवडणुकीत काही मंडळींनी आपल्याला सोबत राहण्याचा शब्द दिला होता. त्यात कोणी काय केले, हे आपणाला माहिती आहे म्हणून कोणाशी सूडबुद्धीने वचपा कधी काढणार नाही. त्यांनी विरोध केला तर मला सोसेल, पण माझा विरोध त्यांना सोसणार नाही. माझ्या दृष्टीने आमदारकी महत्त्वाची नाही. आमदारकीवेळच्या शब्दापेक्षा आताच्या माझ्या शब्दाला अधिक वजन आहे. (प्रतिनिधी)
कोल्हापूर : भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषदेचे जागावाटप अधिकृतपणे जाहीर केले; परंतु त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद त्यांनी फक्त शिरोळपुरतीच गृहित धरल्याने अन्य तालुक्यांतील एकही जागा भाजप ‘स्वाभिमानी’ला देणार नसल्याचे चित्र पुुढे आले आहे. परिणामी संघटना भाजपच्या आघाडीपासून आणखी दोन पावले दूर गेल्याची प्रतिक्रिया सोमवारी व्यक्त झाली.
स्वाभिमानी संघटना ही भाजपच्या आघाडीतील पहिला व विश्वासार्ह मित्रपक्ष असतानाही त्यांना विचारात न घेताच पालकमंत्री दादांनी आघाडीची घोषणा केली. त्यांनी आजपर्यंत ‘स्वाभिमानी’शी आघाडीबाबत संघटनेच्या कोणत्याच नेत्याला फोन केलेला नाही. त्यामागे संघटनेला बेदखल करण्याची रणनीती असावी, अशी शंका व्यक्त होत आहे.
चर्चेची जबाबदारी भाजपने आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडे सोपवली. त्यांनी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलाविले; परंतु ‘संघटनेची ताकद आता पूर्वीसारखी राहिली नाही’ असे वक्तव्य करून त्यांनी नकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी ‘पुन्हा भेटायची गरज नाही...फोनवरच बोलू’ असे उत्तर दिले. याचा अर्थ संघटनेशी त्यांना आघाडी नकोच आहे असेच ‘स्वाभिमानी’लाही वाटते. त्यामुळे संघटनेने शिरोळसह ज्या मतदारसंघात ताकद आहे, तेथील कार्यकर्त्यांशी थेट चर्चा करून निवडणुकीची तयारी केली. भाजपने रविवारी ६७ जागांचे संभाव्य जागावाटप जाहीर केले. शिरोळ तालुक्यातील सहाही जागा रिक्त सोडून उर्वरित तालुक्यांतील जागा त्यांनी ताराराणी, जनसुराज्य व मित्रपक्षांना दिल्या. याचाच अर्थ संघटनेची ताकद फक्त शिरोळपुरतीच मर्यादित आहे असे भाजपला वाटते. मग फक्त शिरोळपुरतीच भाजपशी आघाडी करण्यात ‘स्वाभिमानी’लाही रस नाही. तिथे भाजपची ताकद नसल्याचीही प्रतिक्रिया व्यक्त झाली.
दादांच्या बोलण्यात दमपालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास असल्यानेच मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे. तथ्य असल्याशिवाय दादा बोलत नाहीत, त्यांच्या बोलण्यात दम असतो, असे महाडिक यांनी सांगितले.
‘दक्षिण’ची तटबंदी कामांमुळे मजबूतच
दक्षिण मतदारसंघात कोणी कितीही प्रयत्न केले तर तिथे आमदार अमल महाडिक यांचा बालेकिल्ला भक्कम आहे. कोट्यवधीच्या विकासकामाच्या माध्यमातून तटबंदी मजबूत केल्याचे महाडिक यांनी सांगितले.
‘स्वाभिमानी’चे ‘शत्रू’
ते भाजपचे ‘मित्र’
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाटचालीत जे गेली पंधरा वर्षे सातत्याने संघटनेच्या प्रत्येक गोष्टीस विरोध करत आहेत ते धनाजीराव जगदाळे, अशोक माने, अनिल यादव, धैर्यशील माने हे आता भाजपचे मित्र बनले आहेत. जरी आम्ही भाजपशी आघाडी केली तरी हे संघटनेच्या कार्यकर्त्यांना कधीच प्रामाणिकपणे मदत करणार नाहीत. त्यांच्या हातात हात देण्याचीही मानसिकता नसल्याची तिखट प्रतिक्रिया संघटनेतून व्यक्त होत आहे.
शेट्टी, आवाडे, मिणचेकर एकत्र
कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री प्रकाश आवाडे, शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची बैठक झाली. बैठकीत हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय झाला. दोन दिवसांत एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची घोषणा होणार असल्याचे समजते.
क्षीरसागरयांना प्रत्युत्तर
लोकशाहीत कोणालाही टिकाटिप्पणी करण्याचा हक्क असल्याने राजेश क्षीरसागर यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही. माझे चिलखत मजबूत असल्याने अशा टीकांचा परिणाम होत नाही. मी शिवसेनेत होतो. पक्षात असे फार काळ चालत नाही. शिवसेना-भाजप एकत्र आल्यानंतर क्षीरसागर काय करणार, असा सवाल महाडिक यांनी केला.