गुरुजींचा आनंद पोटात मावेना...!
By admin | Published: January 14, 2016 12:46 AM2016-01-14T00:46:51+5:302016-01-14T00:46:51+5:30
लाड-पाटीलवरील कारवाई : निलंबन शक्य, कर्मचारी ‘ओळखपत्रात’
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक विनायक आप्पासाहेब पाटील, वरिष्ठ सहाय्यक विकास दत्तात्रय लाड यांना लाचलुचपत विभागाकडून रंगेहात पकडल्याचा जिल्ह्यातील शिक्षकांना अक्षरक्ष: अत्यानंद झाला.
फार लूट सुरू होती, आता थोडा तर चाप लागेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. कार्यालयातील कर्मचारी इतकी राजरोस लूट करीत असताना त्यांचे विभागप्रमुख व मुख्य कार्यकारी अधिकारीही त्याकडे कसे काय डोळेझाक करीत होते, अशीही विचारणा आता होऊ लागली आहे.
दरम्यान, या दोघांवर अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांना कारवाईचे अधिकार आहेत. बुधवारी दिवसभर माध्यमिक शिक्षण विभागात सन्नाटा होता. विनायक व विकास यांच्या ‘कारनाम्यां’चीच जिल्हा परिषदेत चर्चा सुरू राहिली.
लाड याच्या मग्रुरीचा त्रास शिक्षकांना होत होता. वरिष्ठ वेतनश्रेणीचे काम आले की तो पहिल्यांदा फाईल रागाने फेकायचा. मग अर्जदार विनंती, विनवणी करत असे. मग मांडवली झाली की फाईल पुढे सरकली जाई. वरिष्ठ वेतन श्रेणीचा प्रस्ताव असेल तर किमान साडेतीन हजारांपासून पाच हजारपर्यंत रक्कम उकळली जाई. कोणही भेटायला आले की राजकीय पुढाऱ्यांची नांवे घेत असे. त्यांच्याशी जवळीक असल्याचा देखावा करे. पैशाशिवाय एकही काम होत नसे असा अनुभव होताच शिवाय वागणूकही मग्रुरीची होती. त्यामुळे लाच प्रकरणी कारवाई झाल्यावर अनेकांनी आनंद व्यक्त केला.
वरिष्ठ वेतनश्रेणीचा आदेश काढण्यासाठी कनिष्ठ लिपिक विनायक पाटील याने तक्रारदार शिक्षकाकडे लाचेची मागणी केली होती. मात्र, लाच लाड यांनी स्वीकारली. त्याप्रकरणी लाचलुचपत विभागाचे पोलिसांनी मंगळवारी लाड व पाटील यांना पकडले.
हे दोघेही जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्यास निलंबन करणे बंधनकारक आहेत. त्यामुळे कारवाई सुरू असतानाच विनायकप्रमाणे काहीजण कोठडीची हवा नको म्हणून पसार होतात. मात्र, कोठडीत न राहिल्यासही प्रकरणाचे गांभीर्य पाहून निलंबित करता येते.
दोघांवरील कारवाईचा अहवाल सामान्य प्रशासनाकडे येईल. त्यानंतर सामान्य प्रशासन पुढील कारवाईसाठी सीईओ सुभेदार यांच्याकडे प्रस्ताव सादर करेल.
सीईओं अंतिम कारवाईचा आदेश काढतील. त्यामुळे पुढील कारवाईसाठी सामान्य प्रशासनास लाचलुचपत विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. लाचप्रकरणासंबंधी दिवसभर सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांत चर्चा सुरू होती.
कार्यालयात कामानिमित्त आलेले कोण आणि कर्मचारी कोण, हे ओळखत नाहीत. त्यामुळे सामान्य प्रशासनाच्या सूचनेनुसार कर्मचारी गळ्यात ओळखपत्र अडकवून फिरताना दिसत होते. माध्यमिक शिक्षण विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी कारवाईचा धसका घेतला.
आज अहवाल : सहकाऱ्यांचे जामीनासाठी प्रयत्न
या दोघांनी लाच घेतल्याच्या कारवाईचा आज, गुुरुवारी लाचलुचपत विभागातर्फे जिल्हा परिषद प्रशासनास अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक उदय आफळे यांनी सांगितले. बुधवारी माध्यमिक विभागातील लाड व पाटील बसत असलेली खुर्ची रिकामी होती. दोघांना जामीन मिळावा, यासाठी काही खाबुगिरीत पटाईत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी पडद्याआड राहून प्रयत्न केले.