गुरुकुल परीक्षेच्या नावावर लूट
By admin | Published: February 15, 2016 10:15 PM2016-02-15T22:15:34+5:302016-02-16T00:07:27+5:30
चंदगड तालुक्यातील प्रकार : बंदीची पालकांची निवेदनाद्धारे मागणी
चंदगड : कोल्हापूर येथील गुरुकुल एज्युकेशन सोसायटीने पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्याच्या नावाने चंदगड तालुक्यातील विद्यार्थ्यांची अक्षरक्ष: लूट चालविली आहे. शिक्षण विभागाने अशा बेकायदेशीर स्पर्धा परीक्षा घेण्यावर बंदी आणावी, अशी मागणी पालकांनी निवेदनातून शिक्षण विभागाकडे केली आहे.
कोल्हापूर येथील गुरुकु ल एज्युकेशन सोसायटी शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची गरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा गेली दोन वर्षे घेत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ३७० रुपये फी म्हणून घेऊन त्या बदल्यात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका व पुस्तके देण्यात येतात.
चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथील व्ही. के. चव्हाण महाविद्यालयातील केंद्रावर ही परीक्षा घेतली. तालुक्यातील ३०० हून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. मात्र, गुरुकुलचे संयोजकच ११ ऐवजी ११.४५ ला परीक्षा केंद्रावर आले. परीक्षा होणार की नाही या विवंचनेत पालक व विद्यार्थी होते. एकाच वर्गात ३०० विद्यार्थ्यांना परीक्षेस बसवून परीक्षा घेत होते. मात्र, यावेळी पालकांनी विरोध केल्यानंतर विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था केली.
विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रश्नपत्रिकेमध्येही १० ते १२ प्रश्न चुकीचे होते. गलथान व्यवस्थापन असलेल्या गुरुकुलचे कोणीही प्रतिनिधी यावेळी उपस्थित नव्हते. पदवीधर युवकांना हाताशी धरून कमिशन बेसिसवर या युवकांना गुरुकुलच्या संयोजकांनी कामावर ठेवले आहे. हे युवक तालुक्यातील प्रत्येक शाळांमध्ये जाऊन स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर परीक्षा असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवावे, असे आवाहन करतात. तसेच परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे पेपर न तपासताच आपल्या मर्जीतील विद्यार्थ्यांनाच मेरिटमध्ये बसविले जाते, असा आरोप पालकांनी केला असून, विद्यार्थ्यांकडून फी उकळण्याचा हा उद्योग शिक्षण विभागाने बंद करावा, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
निवेदनावर बापू शिरगावकर,
डॉ. पराग जोशी, रवींद्र गणाचार्य, सुधीर सावंत, मंगल पाटील, ज्योती शिनोळकर, सीमा सावंत, सुप्रिया पाटील, नीता पाटील, डॉ. संदीप चव्हाण, गजानन पाटील, शिवकुमार मिश्रकोटी, युवराज पाटील, मोतिराम भोगण, रामचंद्र सुतार, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)