गुरुपौर्णिमेला नृसिंहवाडीत लाखांवर भाविक
By admin | Published: July 10, 2017 12:27 AM2017-07-10T00:27:05+5:302017-07-10T00:27:05+5:30
गुरुपौर्णिमेला नृसिंहवाडीत लाखांवर भाविक
लोकमत न्यूज नेटवर्क
नृसिंहवाडी : दत्तभक्तांच्या अलोट गर्दीत ‘दिगंबरा दिगंबरा...’च्या अखंड नामस्मरणात व ‘श्री गुरुदेव दत्त’च्या गजरात श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. लाखावर भाविकांच्या हजेरीने दत्तमंदिर गर्दीने फुलून गेले होते. दुपारी बारानंतर वाढलेली भक्तांची गर्दी रात्रीपर्यंत होती. सध्या चालू असलेल्या कन्यागत महापर्वकालाच्या अनुषंगाने भाविकांनी स्नान करून दर्शन घेतले.
रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरात पहाटे साडेचार वाजता काकडआरती व पूजा झाली. सकाळी सात ते बारा यावेळेत भक्तांकडून ‘श्रीं’ना पंचामृताने अभिषेक करण्यात आला. दुपारी साडेबारा वाजता श्रींचे चरणकमलावर महापूजा करण्यात आली. त्यानंतर भजनी मंडळांनी भजन केले. तीन वाजता पवमान पंचसूक्तांचे पठण करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता ह.भ.प. शरदबुवा घाग यांचे टेंब्ये स्वामी मठात कीर्तन झाले. रात्री ९ नंतर दत्त मंदिरात आरती होऊन इंदुकोटी स्तोत्र, पदे म्हणण्यात आली. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा, आदी राज्यांतून असंख्य भक्तगणांनी हजेरी लावली व गुरुचरणाचे दर्शन घेऊन गुरुपूजन, जप, जाप्य, तसेच अनुष्ठान करून गुरुंचे आशीर्वाद
घेतले.
सांगली, मिरज, इचलकरंजी, उगार आदी अनेक भागांतून भाविक दत्त दर्शनासाठी चालत होते. टू व्हीलरवरून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. भाविकांच्या सोयीसाठी दत्त देव संस्थानने दर्शनरांग, मुखदर्शन व्यवस्था, दुपारी व रात्री महाप्रसाद, आदी व्यवस्था केली होती. ग्रामपंचायतमार्फत पार्किंग, दिवाबत्ती आरोग्य व्यवस्था, जंतुनाशक फवारणी, साफसफाई, आदी सोयी-सुविधा करण्यात आल्या होत्या. सर्व व्यवस्थेवर दत्त देव संस्थानचे अध्यक्ष राजेश खोंबारे, सचिव दामोदर संतपुजारी, सरपंच अरुंधती जगदाळे, उपसरपंच धनाजी जगदाळे लक्ष ठेवून होते. मंदिर व परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त होता.
एस. टी. व्यवस्था खोळंबली
कुरुंदवाड एस. टी. आगाराने कोल्हापूर, संभाजीनगर, कागल, इचलकरंजी, सांगली, मिरज, गगनबावडा, आदी आगारांच्या साह्याने सर्वच मार्गावर ५० हून अधिक जादा बसफेऱ्यांची व्यवस्था केली होती. मात्र, कुरुंदवाड-नृसिंहवाडी मार्गाकडेलाच भक्तांनी मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग केल्याने वाहतून ठप्प झाली. परिणामी अनेक बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. बस वेळेवर न धावल्याने प्रवाशांना तासन्तास बसस्थानकावर उभे राहावे लागले.