गुरुपुष्यामृतला सोने खरेदीला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:35 AM2021-02-26T04:35:06+5:302021-02-26T04:35:06+5:30
कोल्हापूर : सोन्यावरील करातील कपात, कोरोनानंतर अन्य क्षेत्रांना मिळालेली उभारी, अशा विविध कारणांनी गडगडलेल्या सोन्याच्या दराने बाजारपेठेला मात्र उभारी ...
कोल्हापूर : सोन्यावरील करातील कपात, कोरोनानंतर अन्य क्षेत्रांना मिळालेली उभारी, अशा विविध कारणांनी गडगडलेल्या सोन्याच्या दराने बाजारपेठेला मात्र उभारी दिली आहे. गुरुपुष्यामृत योगावर ग्राहकांनी विवाह, समारंभांसाठीचे टेंपल ज्वेलरी, नेकलेस, पाटल्या, बांगड्या या अलंकारांसह गुंतवणूक म्हणून चोख सोन्याच्या खरेदीला प्राधान्य दिले. गुुरुवारी सोन्याचा दर ४६ हजार ७०० इतका होता. पुढील काही दिवसात आणखी काही प्रमाणात दर उतरण्याची शक्यता बाजारपेठेत वर्तवली जात आहे.
नवीन वर्षातील दुसरा गुरुपुष्यामृत योग काल झाला. यादिवशी सुवर्ण खरेदी केली की घरात समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे ग्राहक आपल्या ऐपतीप्रमाणे यादिवशी सोने खरेदीवर भर देतात. गेल्या वर्षभरात कोरोनाने केलेला कहर, व्यवसायातील चढ-उतार, पगार कपात अशा विविध अडचणींचा सामना केल्यानंतर आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. कोरोना काळात खरेदी नसतानाही सट्टाबाजाराने सोन्याचे दर अगदी ५८ हजारांपर्यंत वाढवले होते. आता मात्र नव्या वर्षात सादर झालेल्या बजेटमध्ये सोन्यावरील कर कमी करण्यात आला आहे. तेव्हापासून सातत्याने सोन्या-चांदीचे दर घसरत आहेत. गुरुवारी सोन्याचा दर ४६ हजार ७०० इतका होता, दरात झालेली ही घसरण जवळपास २० टक्के इतकी आहे. या घसरणीचा पुरेपूर फायदा करून घेत ग्राहकांनी विविध अलंकारांची खरेदी केली. यात अलंकारांसोबतच गुंतवणुकीचा पर्याय म्हणून वळे, कॉईन, बिस्कीट अशा चोख सोन्याचाही समावेश आहे.
---
सोन्याचे दर उतरल्याने बाजारपेठेत उत्साह आहे. कोरोनाच्या वर्षभराच्या चढ-उतारानंतर गुरुपुष्यामृत योगावर ग्राहकांनी अलंकारांची खरेदी करून हा उत्साह द्विगुणीत केला आहे.
भरत ओसवाल (महेंद्र ज्वेलर्स)
---
फोटो नं २५०२२०२१-कोल-महेंद्र ज्वेलर्स
ओळ : गुरुपुष्यामृत योगावर गुरुवारी कोल्हापुरातील सोन्या-चांदीच्या शोरूममध्ये ग्राहकांनी अलंकार खरेदीसाठी गर्दी केली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--