गुरू-शिष्यांमध्ये रंगतोय कलगीतुरा
By admin | Published: March 23, 2015 09:27 PM2015-03-23T21:27:19+5:302015-03-24T00:19:14+5:30
सहकारातील निवडणुका : राधानगरी, भुदरगडमध्ये राजकीय हवा तापली
निवास पाटील - सोळांकूर -जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, भोगावती व बिद्री साखर कारखान्यांच्या निवडणुकींची धांदल सुरू झाल्याने राधानगरी, भुदरगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गुरू-शिष्य असणाऱ्या आजी-माजी आमदारांमध्ये कलगीतुरा रंगत आहे. यामुळे दोन्ही तालुक्यांत नव्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.जिल्हा बँकेचे ठराव गोळा करण्यात राधानगरीमध्ये ‘राष्ट्रवादी’चे ए. वाय. पाटील यांनी, तर भुदरगडमध्ये ‘राष्ट्रवादी’चे माजी आमदार के. पी. पाटील यांनी आघाडी घेतली आहे. सर्वाधिक ठरावधारक आपल्या पाठीशी असल्याचा दावा दोघांनीही केला आहे. मात्र, त्यांना रोखण्यासाठी विरोधी मंडळी ठरावाची गोळाबेरीज करू पाहत आहेत.गोकुळ दूध संघास मदत करण्याच्या पार्श्वभूमीवर ‘राधानगरी’चे प्रतिनिधित्व करणारे विद्यमान संचालक अरुण डोंगळे, भुदरगडमधून संचालक धैर्यशील देसाई, दिनकर कांबळे यांच्या माजी आमदार बजरंग देसाई गटाने विधानसभेला माजी आमदार के. पी. पाटील यांना मदत केली, तर ‘राधानगरी’चे दुसरे प्रतिनिधी पी. डी. धुंदरे यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांना छुपी मदत केली. आता काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादींसह सर्वच गटांनी सत्तारूढ गटाकडे ठराव देऊ केले आहेत. त्याची झळ बसायला स्थानिक पातळीवर आतापासूनच सुरू आहे. दोन्ही साखर कारखान्यांच्या वाढीव सभासदांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. बिद्री साखर कारखान्याच्या साखर विक्रीबाबत साशंकता
असून, ढपला संस्कृती बोकाळलेली असल्याचा दावा विरोधी गटाकडून मिळेल त्या समारंभात होत आहे.याउलट सत्तारूढ गटाकडून आरोपांचे खंडन करताना, कारखान्याचा कारभार स्वच्छ असून, सहवीजसारखा प्रकल्प सक्षमरीत्या चालू आहे. तीन वर्षांचा कारभार पाहूनच पुरस्कार दिला जातो. स्वत:ची गुऱ्हाळघरे चालविणाऱ्यांनी बोलू नये. प्रकल्पाच्या नावाखाली लाखो रुपयांची माया गोळा करणाऱ्यांनी प्रकल्प कोठे आहेत ते अगोदर दाखवावेत? असे प्रत्युत्तर दिले जात आहे.या निवडणुकीसाठी सत्तारूढ गटाकडून कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्याचे काम सुरू आहे, तर विरोधी गटाकडून नाराज कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माजी आमदार दिनकरराव जाधव हे माजी आमदार के. पी. पाटील यांचे गुरू आहेत, तर आमदार प्रकाश आबिटकर हे के. पी. पाटील यांचे शिष्य आहेत. गुरू-शिष्य असणाऱ्या आजी-माजी आमदारांचा कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. सत्तारूढ गटाकडून आमदार हसन मुश्रीफ, आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील हे राजकीय मोट बांधत आहेत. विरोधी गटातून आमदार प्रकाश आबिटकर, संजयबाबा घाटगे, संजय मंडलिक, दिनकर जाधव, विजयसिंह मोरे, आदी मंडळी सक्रिय झाली आहेत.
समीकरणे बदलणार
तालुक्यांत नव्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे
जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, भोगावती व बिद्री साखर कारखान्यांच्या निवडणुकींसाठी मोर्चेबांधणी
या निवडणुकीसाठी सत्तारूढ गटाकडून कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्याचे काम सुरू आहे, तर विरोधी गटाकडून नाराज कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.