आजर्यात पोलिसांची मोठी कारवाई, १३ लाखांचा गुटखा जप्त; एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 04:08 PM2022-03-14T16:08:12+5:302022-03-14T17:06:41+5:30
बेकायदेशीर गुटखा वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर आजरा पोलिसांनी वेळवटी फाट्याजवळ सापळा रचला होता. यावेळी पोलिसांनी १३ लाख ३४ हजारांचा गुटखा व ३ लाखांचा टेम्पो जप्त केला.
आजरा : आजरा - आंबोली मार्गावर वेळवट्टी ( ता. आजरा ) फाट्यानजीक पोलिसांनी बेकायदेशीर गुटखा वाहतूक प्रकरणी कारवाई करत एकास अटक केली. यावेळी १३ लाख ३४ हजारांचा गुटखा व ३ लाखांचा टेम्पो असा १६ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शितल जनार्दन पाटील ( वय ४६ रा.बांदा, ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग ) असे या अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, बेकायदेशीर गुटखा वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर आजरा पोलिसांनी वेळवटी फाट्याजवळ सापळा रचला होता. सावंतवाडीहून टेम्पो येताच त्याला थांबवून पाहणी केली. त्यामध्ये गोवा बनावटीचा गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूचे पॅकेट्स आढळून आले. यावेळी पोलिसांनी १३ लाख ३४ हजारांचा गुटखा व ३ लाखांचा टेम्पो जप्त केला आहे.
याबाबतची फिर्याद पो.हे.कॉ पांडुरंग गुरव यांनी आजरा पोलिसात दिली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, सहाय्यक फौजदार बी. एस. कोचरगी, पो.हे.कॉ संदीप म्हसवेकर, पांडुरंग गुरव, संतोष गस्ती, अनिल तराळ, रणजित जाधव, विशाल कांबळे, प्रशांत पाटील यांनी केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील हरुगडे हे करीत आहेत.