ग्रामीण भागातही गुटखा निर्मितीचे केंद्र

By admin | Published: September 17, 2015 09:55 PM2015-09-17T21:55:02+5:302015-09-18T23:41:33+5:30

शिरोळ तालुका : मुळाशी जाऊन तपास करण्याचे पोलिसांसमोर आव्हान

Gutkha production center in rural areas too | ग्रामीण भागातही गुटखा निर्मितीचे केंद्र

ग्रामीण भागातही गुटखा निर्मितीचे केंद्र

Next

संदीप बावचे -- जयसिंगपूर  इचलकरंजी येथील गुटखा कारवाईची घटना ताजी असतानाच शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे येथे गुटखा निर्मिती कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी बेकायदेशीर गुटखाप्रकरणी कारवाई केल्याने पुन्हा एकदा नियंत्रण ठेवणाऱ्या संबंधित विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संबंधितांवर जरब बसविली, तरच अवैध गुटखा निर्मिती केंद्रांवर चाप बसणार आहे.  इचलकरंजी हे पश्चिम महाराष्ट्रातील गुटखा निर्मिती व विक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. शहरालगतच कर्नाटक राज्याची हद्द असल्याने तेथून सहजासहजी गुटखा उपलब्ध होत असल्याचे मिळालेल्या माहितीतून पुढे आले आहे. या तस्करीतूनच इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागाला याची लागण लागली आहे. आॅगस्ट २०१५ मध्ये अवैध गुटखा निर्मितीचे केंद्र पोलिसांनी उद्ध्वस्त केल्याची घटना ताजी असतानाच इचलकरंजी शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोंडिग्रे येथे मंगळवारी (दि. १५) जयसिंगपूर पोलिसांनी गुटखा निर्मिती कारखान्यावर छापा टाकून गुटखा मिक्सिंग करणाऱ्या दोन मशिनरींसह विमल, डीडी, सागर अशा गुटख्यांचे पाऊचदेखील जप्त केले. यातील मुख्य सूत्रधार विलास जमदाडे (हरीपूर) व कुमार कचरे (कोंडिग्रे) हे दोघे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाय परप्रांतीय कामगार मिळून आल्याने संशयितांची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. गुटखा तयार करण्यासाठी कर्नाटकातून कच्चा माल आणून तो याठिकाणी पक्का करण्यात येत होता. विशेष म्हणजे या गुटख्याच्या पाऊचवर ठिकाण, तारीख अथवा इतर कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. तरीही बाजारामध्ये खुलेआम तो विकला जात होता. याचा तपास करण्याचे आवाहन जयसिंगपूर पोलिसांसमोर आहे. अवैध गुटखा निर्मितीचे कारखाने आता ग्रामीण भागातही पोहोचू लागल्यामुळे यावर जरब बसविणार तरी कोण? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. राज्य शासनाने गुटख्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असला, तरी तो आता नावापुरताच शिल्लक राहत आहे. कारवाईनंतर संशयित जामिनावर पुन्हा मोकाट सुटतात व नव्याने गुटखा निर्मितीचा उद्योग सुरू होतो. हे इचलकरंजीतील कारवाईने स्पष्ट झाले आहे. येथील कारवाईनंतर गुटखा हद्दपार होईल, अशी अशा असतानाच कोंडिग्रे येथील कारवाईतून पुन्हा ही यंत्रणा कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


कायद्यातील पळवाटा संशयितांच्या पथ्यावर
कायद्यातील पळवाटेमुळे संशयित आरोपी मोकाट सुटतात. कारवाईनंतर त्यांना ठोस शिक्षा होत नाही. यामुळे उत्पादकांना काहीच भय उरलेले नाही. त्यामुळे पुन्हा गुटखा उत्पादन जोमात सुरू असल्याचे वास्तव आहे.

कर्नाटकातून कच्च्या मालाची आवक
कर्नाटकातून कच्चा माल आणण्यात आल्याचे कोंडिग्रे येथील कारवाईतून स्पष्ट झाले आहे. यामुळे हा कच्चा माल पुरविणाऱ्या यंत्रणेचे उच्चाटन करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. शासनाने बंदी घातल्यामुळे गुटख्याच्या किमतीत भरमसाठ वाढ करून उत्पादकांनी चांगलीच कमाई केली. यामुळे आजही परिसरात गुटखा राजरोसपणे मिळत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Gutkha production center in rural areas too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.