Kolhapur: पाठलाग करून पकडला साडेतीन लाखांचा गुटखा, दोघांना अटक
By उद्धव गोडसे | Published: April 2, 2024 03:24 PM2024-04-02T15:24:01+5:302024-04-02T15:24:35+5:30
राजारामपुरी पोलिसांची कारवाई
कोल्हापूर : गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणा-या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी पाठलाग करून पकडले. शिवाजी विद्यापीठ ते सायबर चौक मार्गावर मंगळवारी (दि. २) पहाटे चारच्या सुमारास ही कारवाई केली. टेम्पोचालक तौसिफ खुदबुद्दीन शिलेदार (वय २२, रा. रविवार पेठ, कोल्हापूर) आणि जावेद मलिक बागवान (वय ३६, रा. लाईन बाजार, कसबा बावडा, कोल्हापूर) या दोघांना पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून साडेतीन लाखांचा गुटखा जप्त केला.
राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक सचिन चंदन हे सहका-यांसह मंगळवारी पहाटे शिवाजी विद्यापीठ रोडवर गस्त घालत होते. केएसबीपी चौकात त्यांनी एका भरधाव टेम्पोला थांबण्याची सूचना केली. मात्र, टेम्पो न थांबता सायबर चौकाच्या दिशेने गेला. संशय बळावल्याने उपनिरीक्षक चंदन यांनी सायबर चौकात नाकाबंदीला असलेल्या पोलिसांना संबंधित टेम्पो अडवण्यास सांगितले. पोलिसांनी टेम्पो अडवून चौकशी सुरू केली. पाठलाग करीत आलेले उपनिरीक्षक चंदन यांनी टेम्पोची झडती घेतली असता, पांढ-या रंगाच्या पोत्यांमध्ये गुटखा असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी टेम्पोचालक शिलेदार याच्यासह शेजारी बसलेला बागवान याला अटक करून सुमारे साडेतीन लाखांचा गुटखा आणि साडेसहा लाखांचे टेम्पो जप्त केला. ही कारवाई उपनिरीक्षक चंदन यांच्यासह अंमलदार समीर शेख, दीपक येडगे, विराज डांगे, जगदीश बामणीकर, प्रियांका जनवाडे, आदींनी केली.
बागवान याचा गुटखा
अटकेतील संशयित जावेद बागवान याने कर्नाटकातून गुटख्याची खरेदी केली होती. तो स्वत: वाहन भाड्याने घेऊन गुटखा आणण्यासाठी गेला होता. तो पुढे काही विक्रेत्यांना गुटख्याचा पुरवठा करणार होता, अशी माहिती चौकशीतून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.