गुंता सुटला; १८ उमेदवारांनी भरले

By admin | Published: October 10, 2015 12:30 AM2015-10-10T00:30:20+5:302015-10-10T00:30:20+5:30

अर्ज इंगवले, वळंजू, सोनवणेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन

Gutta is free; 18 candidates filled | गुंता सुटला; १८ उमेदवारांनी भरले

गुंता सुटला; १८ उमेदवारांनी भरले

Next

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याची पद्धत रद्द करून छापील अर्ज भरून देण्याची मुभा मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवारांवरील ताण काहीसा हलका झाला. त्यामुळे शुक्रवारी एका दिवसात १८ उमेदवारांनी २३ अर्ज दाखल केले तर १२५० उमेदवारी अर्जांची विक्री झाली. माजी महापौर नंदकुमार वळंजू, तेजस्विनी रविकिरण इंगवले, अरुण सोनवणे यांनी शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पितृपंधरवडा, आॅनलाईन अर्ज भरण्याचे बंधन यामुळे गेल्या तीन दिवसांत उमेदवारांनी फारसा उत्साह दाखविला नाही पण आॅनलाईन अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ही पद्धत रद्द केल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले. शुक्रवारी दिवसभर सातही क्षेत्रीय कार्यालयांत उमेदवारी अर्ज नेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची अक्षरश: गर्दी उसळली. सकाळच्या वेळेत काही ठिकाणी इच्छुक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी रांगा लावल्याचे दिसून आले. दिवसभर निवडणूक कार्यालयांतून गर्दी दिसून येत होती. एकाच दिवसात १२५० अर्जांची विक्री झाली. शुक्रवारी शहरातील विविध प्रभागांतून १८ उमेदवारांनी २३ अर्ज भरले. त्यामध्ये ताराराणी आघाडीचे उमेदवार व माजी महापौर नंदकुमार वळंजू (शास्त्रीनगर-जवाहरनगर), तेजस्विनी रविकिरण इंगवले (फिरंगाई), माजी नगरसेवक ईश्वर परमार (बिंदू चौक) यांचा तर राष्ट्रवादीच्या उमेदवार सुवर्णा विश्वनाथ सांगावकर (बाजारगेट) यांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाच्या रचना राजू मोरे यांनी फुलेवाडी प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्यावतीने संजय राणे यांनी तुळजाभवानी मंदिर प्रभागातून, अरुण सोनवणे यांनी जवाहरनगरमधून, तर शारदा रवींद्र सरनाईक यांनी चंद्रेश्वर प्रभागातून उमेदवारी अर्ज भरला. नंदकुमार वळंजू, तेजस्विनी इंगवले, अरुण सोनवणे यांनी त्यांच्या त्यांच्या प्रभागात मिरवणुका काढून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे निवडणूकमय वातावरण निर्माण झाले. गेल्या तीन दिवसांपासून शांत असणारे वातावरण आता ढवळून निघत आहे. दरम्यान, प्रारूप मतदार याद्या दुरूस्त केल्यानंतरही अंतिम मतदार यादीत शहरातील सुमारे पाच हजार मतदारांच्या नावांची नोंद ते राहत असलेले प्रभाग सोडून अन्य प्रभागांत झाली होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर योग्य दुरुस्ती करत त्यांच्या नावांची नोंद मतदार राहत असलेल्या प्रभागात करण्यात आली. चुकीची दुरूस्ती झाल्यामुळे या मतदारांना न्याय मिळाला आहे. जास्तीत जास्त चुका सुधारण्याचा प्रयत्न मनपा प्रशासनाने केला असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Gutta is free; 18 candidates filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.