शिक्षक मित्र पोहोचविणार घराघरात ज्ञानगंगा!,शिक्षण विभागाचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 12:02 PM2020-10-05T12:02:22+5:302020-10-05T12:07:41+5:30
कोरोना संकटामुळे राज्यात शाळा बंद आहेत. जिल्ह्यातील ३२ टक्के विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षणापासून वंचित न ठेवण्याची जबाबदारी 'शिक्षक मित्र' यांनी घेतली आहे. त्यांच्या माध्यमातून शिक्षणापासून दुर गेलेली मुलं पुन्हा प्रवाहात येण्यासाठी मदत होणार आहे.
सातारा : कोरोना संकटामुळे राज्यात शाळा बंद आहेत. जिल्ह्यातील ३२ टक्के विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षणापासून वंचित न ठेवण्याची जबाबदारी 'शिक्षक मित्र' यांनी घेतली आहे. त्यांच्या माध्यमातून शिक्षणापासून दुर गेलेली मुलं पुन्हा प्रवाहात येण्यासाठी मदत होणार आहे.
कोरोना संकटामुळे राज्यात शाळा बंद आहेत. मात्र, ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. यामध्ये व्हर्च्युअल क्लास, व्हिडिओ द्वारे तसेच दुरदर्शनवरील टिलीमिली कार्यक्रम, गुगल क्लासरूम यांचा समावेश आहे.
युट्यूब चॅनेल, जियो चॅनल, दिक्षा अँपसह अन्य शैक्षणिक अँपद्वारे शिक्षण दिले जात आहे. जिल्हयातील ३२ टक्के विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. अनेकांकडे साधे फोन आहेत. स्मार्ट फोन किंवा साधे फोन नसणारे विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून दूर राहण्याची शक्यता आहे.
डोंगरी भागात रेंजची समस्या आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अन्य उपाय योजना करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शिक्षक मित्र आणि समुपदेशन याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा पर्याय शिक्षण विभागाने काढला.
सुविधा नाही म्हणून शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना नैराश्य येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्यासाठी फोनद्वारे समुपदशेन करणे सुरू आहे. स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्यांनी पुढे येण्याचे आवाहन केल्यानंतर त्यालाही सातारकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
जिल्ह्यात व्यवसाय मार्गदर्शनासाठी २० समुपदेशक नियुक्त आहेत. कोविड १९ बाबत तसेच ताणतणावाबाबत त्यांचे समुपदेशन घेण्यास विद्यार्थी, पालकांना प्रवृत्त करावे. व्हर्च्युअल क्लासमध्ये समुपदेशकांना लिंक देऊन जॉईन केल्यावर थेट विद्यार्थ्यांशी त्यांचा संपर्क होऊ शकेल त्या दृष्टीने समुपदेशकांच्या संपर्कात राहून योग्य ती कार्यवाही करावी, असे सुचित करण्यात आले आहे.
अशी आहे शिक्षक मित्र संकल्पना
गावातील डी. एड., बी. एड. किंवा पदवीधर तरूण-तरूणी यांना स्वंयप्रेरणेने विना मोबदला मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करून त्य ाविद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणावे. यामध्ये कुठल्याही प्रकारे विद्यार्थी ताण घेणार नाहीत, अशा आनंददायी पध्दतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे.
विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक प्रश्नांचे समाधान पालकांकडून होणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे शिक्षक मित्र आणि समुपदेशन या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जात आहे. याचा लाभही विद्यार्थ्यांकडून घेतला जात आहे.
- राजेश क्षीरसागर,
माध्यमिक शिक्षणाधिकारी, सातारा