पश्चिम महाराष्ट्राचे ज्ञानतीर्थ राजाराम कॉलेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:06 AM2019-06-17T00:06:05+5:302019-06-17T00:06:10+5:30

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे ज्ञानतीर्थ असलेल्या कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयाने स्वातंत्र्यपूर्व आणि त्यानंतरच्या काळात ...

GyanTirtha Rajaram College of Western Maharashtra | पश्चिम महाराष्ट्राचे ज्ञानतीर्थ राजाराम कॉलेज

पश्चिम महाराष्ट्राचे ज्ञानतीर्थ राजाराम कॉलेज

googlenewsNext

संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे ज्ञानतीर्थ असलेल्या कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयाने स्वातंत्र्यपूर्व आणि त्यानंतरच्या काळात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. येथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या ‘राजारामीयन्स’ यांनी देश आणि राज्यांतील विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. जुन्या मुंबई प्रांतातील एक अगग्रण्य उच्च शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महाविद्यालयाने १३९ व्या वर्षात पदार्पण केले आहे.
थोरले राजाराम महाराज, राजर्षी शाहू छत्रपती आणि राजाराम महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये शिक्षणाचा लाभ संपूर्ण प्रजेला मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याअंतर्गत कोल्हापूर संस्थानमध्ये सन १८४८ पासून कोल्हापूर, पन्हाळा, आळते, शिरोळ येथे दरबारच्या खर्चाने व्हर्नाक्युलर शाळा सुरू झाल्या. पहिली इंग्रजी माध्यमाची सरकारी माध्यमिक शाळा १८६७ मध्ये स्थापन झाली.
या शाळेचे पहिल्यांदा राजाराम हायस्कूलमध्ये रूपांतर झाले. त्याला १८८० मध्ये राजाराम महाविद्यालयाची जोड देण्यात आली. नवव्या क्रमांकाने मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले राजाराम महाविद्यालय १९४९ मध्ये संस्थान विलीन झाल्यावर मुंबई राज्याच्या अखत्यारीत आणि १९६० मध्ये महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित झाले. राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील शासकीय महाविद्यालय म्हणून यशस्वीपणे हे महाविद्यालय वाटचाल करीत आहे. सन १८८० पासून मुंबई विद्यापीठाशी, तर पुणे विद्यापीठाच्या स्थापनेपासून नोव्हेंबर १९६२ पर्यंत पुणे विद्यापीठाशी आणि नंतर शिवाजी विद्यापीठाशी महाविद्यालय संलग्न झाले. इतिहासतज्ज्ञ प्राचार्य डॉ. बाळकृष्ण, शिक्षणतज्ज्ञ बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर, शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार, आदींच्या कुशल मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची जडणघडण झाली.
या महाविद्यालयाचा परिसर ६६ एकरांचा आहे. विविध २२ इमारतींच्या माध्यमातून महाविद्यालयाचे कामकाज चालते. प्रत्येक विषयासाठी सुसज्ज, स्वतंत्र प्रयोगशाळा आहे. सव्वा लाखाहून अधिक ग्रंथसंपदा आणि नियतकालिके, स्वतंत्र अभ्यासिका आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी एक हजार क्षमतेचे अत्याधुनिक सभागृह असून व्यायामशाळा, टेनिस आणि बॅडमिंटन कोर्ट, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहे आहेत. या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी घडले आहेत. त्यांपैकी काहींनी विविध क्षेत्रांत देशाचे आणि विविध राज्यांचे नेतृत्व केले आहे.
बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. आणि एम.ए., एम.कॉम. अभ्यासक्रमांचे दरवर्षी २९२८ विद्यार्थी-विद्यार्थिनी या ठिकाणी शिक्षण घेतात. राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) सन २०१५-१६ मध्ये कॉलेजचे पुनर्मूल्यांकन झाले. त्यावेळी ‘अ’ मानांकन कॉलेजला प्राप्त झाले आहे. महाविद्यालयात प्राध्यापकांची नियुक्ती ही राज्य लोकसेवा आयोगाकडून केली जाते. विद्यार्थ्यांना उपग्रहाद्वारे दूरशिक्षण देण्याचा पहिला मान या महाविद्यालयाला मिळाला आहे. क्रमिक शिक्षणासह नागरी, प्रशासकीय सेवा, स्पर्धा परीक्षांसह व्यक्तिमत्त्व विकासासाठी येथे मार्गदर्शन केले जाते.

आजपर्यंतचे प्राचार्य : सी. एच. कँडी, जे. एफ. अडेअर, आर. एस. ल्युसी, ए. डार्बी, आर. एन. आपटे, नैपाळसिंग, डॉ. बाळकृष्ण, बॅ. बाळासाहेब खर्डेकर, डॉ. अप्पासाहेब पवार, व्ही. के. गोकाक, डी. पी. पत्रावळी, आरमॅन्डो मेनेझिस, सी. डी. देशपांडे, डॉ. बी. आर. ढेकणे, जी. व्ही. असोळकर, एस. डी. बाळ, डॉ. वि. वा. करंबेळकर, डॉ. देवरस, मा. ग. मराठे, भगवंतराव देशमुख, रामकृष्ण ढमढेरे, एस. पी. बोरगांवकर, डॉ. पी. एल. मिश्रा, एस. आर. ओझरकर, व्ही. एस. पाटील, एल. आर. पत्की, डॉ. व्ही. के. क्षीरसागर, एस. पी. ननीर, एस. बी. महाराज, व्ही. बी. हेळवी, डॉ. अण्णासाहेब खेमनर.

विविध क्षेत्रांतील नामवंत ‘राजारामीयन’
महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘राजारामीयन’ असा उल्लेख केला जातो. महादेव रानडे, बळवंत जोशी, रघुनाथ सबनीस, वामन आपटे, रघुनाथ आपटे, गोपाळ टेंबे, विष्णू विजापूरकर, गोपाळ कृष्ण गोखले, श्रीपाद बेलवलकर, न. चिं. केळकर, माधव ज्यूलियन, ना. सी. फडके, इंदिरा संत, विजया राज्याध्यक्ष, पी. सावळाराम, व्ही. के. गोकाक, पांडुरंग पाटील, गोविंद टेंबे, अण्णासाहेब लठ्ठे, वासुदेव मिराशी, खाशाबा जाधव, शामराव तेंडोलकर, पार्श्वनाथ आळतेकर, भालचंद्र वालावलकर, दिनकरराव सुर्वे, बी. जी. खेर, अप्पासाहेब पवार, विश्वनाथ पाटील, जे. पी. नाईक, विष्णुपंत घाटगे, बी. डी. जत्ती, छत्रपती शहाजी महाराज, यशवंतराव चव्हाण, बॅ. बाबासाहेब भोसले, विंदा करंदीकर, रॅँग्लर व्ही. व्ही. नारळीकर, वसंतराव गोवारीकर, शिवराम भोजे, आर. व्ही. भोसले, अरुण निगवेकर, जयसिंगराव पवार, माणिकराव साळुंखे, विश्वास नांगरे-पाटील, तेजस्विनी सावंत, आदी नामवंत राजारामीयन आहेत.

Web Title: GyanTirtha Rajaram College of Western Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.