हा तर पी. एन. पाटील यांचा अपरिपक्वपणा
By admin | Published: April 16, 2015 12:52 AM2015-04-16T00:52:15+5:302015-04-16T00:52:15+5:30
मुश्रीफ : ‘राजाराम’नंतर ‘केडीसीसी’चा फैसला
कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीचा संवेदनशील काळ असल्याने अशावेळी फार संयमाने बोलणे गरजेचे होते. पी. एन. पाटील यांनी भाष्य करणे टाळले असते तर बरे झाले असते. अशाप्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे राजकीय अपरिपक्वता असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला. १९ एप्रिलला राजाराम साखर कारखान्याचे मतदान होत असून, त्यानंतरच ‘केडीसीसी’बाबत अंतिम फैसला करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी मंगळवारी, सतेज पाटील यांच्यामुळेच राष्ट्रवादी ‘गोकुळ’मध्ये असे वक्तव्य काँग्रेस कमिटीत केले होते. याबाबत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, कोणत्याही निवडणुकीचा काळ हा संवेदनशील असतो, अफवा व वस्तुस्थिती याबाबत चर्चा होत असते. अशा संवेदनशील काळात
पी. एन. पाटील यांनी भाष्य करणे टाळले असते तर बरे झाले असते पण याबाबत आपण काही भाष्य करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व ठरावधारक सत्तारूढ गटाला ‘पॅनेल टू पॅनेल’च मतदान करणार, क्रॉस व्होटिंग होणार नाही. ‘केडीसीसी’ची माघार २४ एप्रिलपर्यंत आहे, राजाराम साखर कारखान्याचे मतदान संपल्यानंतर आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी स्वत: चर्चा करणार आहे. यापूर्वी चर्चा झालेली आहे, पण त्यावेळी अंतिम फैसला होणार आहे. पी. एन. पाटील, विनय कोरे, सतेज पाटील यांच्याशी चर्चा करून दोन्ही काँग्रेसचे ‘केडीसीसी’त तुल्यबळ पॅनेल कसे करता येईल, यासाठी माझे प्रयत्न आहेत.
प्रत्येक निवडणुकीतील समीकरणे वेगळी असतात, केडीसीसी बँकेत सतेज पाटील नक्कीच आमच्या बरोबर येतील, ‘गोकुळ’चा विषय वेगळा असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील, दिलीप पाटील, सरचिटणीस अनिल साळोखे उपस्थित होते.
‘गोकुळ’मध्ये महाडिकांचीच शक्ती
‘गोकुळ’मध्ये अरुण नरके, विश्वास पाटील, रणजित पाटील, रवींद्र आपटे, आनंदराव पाटील-चुयेकर, भरमू पाटील, अरुण डोंगळे यांची शक्ती आहे. हे सर्वजण आमदार महादेवराव महाडिक यांना दैवत मानतात. त्यामुळे ‘गोकुळ’मध्ये कोणाची शक्ती आहे, हे वेगळे सांगायला नको, असा टोलाही मुश्रीफ यांनी ‘पी. एन.’ यांना हाणला.
निपुण कोरे, समरजित हवे होते
आम्हाला बॅँक चांगली चालवायची आहे, यापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही सांगितलेले आहे. पूर्वीसारखी चालवून चालणार नाही. यासाठी निपुण कोरे व समरजीतसिंह घाटगेंसारखी अभ्यासू माणसे तिथे जाणे गरजेचे होते. पण, कोरे यांचा अर्ज अवैध ठरला व घाटगे यांनी अर्जच दाखल केला नसल्याचे मुश्रीफ म्हणाले.