ताण आणि औषधांच्या माऱ्याने गेले डोक्यावरचे केस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:49 AM2021-09-02T04:49:08+5:302021-09-02T04:49:08+5:30
कोल्हापूर : कोरोना काळातील उपचार, ताण आणि औषधांच्या माऱ्यामुळे केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. ही गळती रोखण्यासाठी पोस्ट कोविडनंतर ...
कोल्हापूर : कोरोना काळातील उपचार, ताण आणि औषधांच्या माऱ्यामुळे केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. ही गळती रोखण्यासाठी पोस्ट कोविडनंतर आहार, व्यायामावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोनामुळे झालेली शरीराची हानी भरून काढण्यासाठी पुढे दोन-तीन महिने विशेष काळजी घ्यावी लागते.
कोरोना झालेल्या व्यक्तीवर उपचार करताना मोठ्या प्रमाणात औषध-गोळ्यांचा मारा करावा लागतो. दिवसाला ८ ते १० प्रकारच्या वेगवेगळ्या गोळ्या दिल्या जातात. शिवाय सलाईन, इंजेक्शन असतातच. ज्यांना जास्त प्रमाणात संसर्ग झाला आहे, त्यांना रेमडेसिविरसारखे इंजेक्शन किंवा ऑक्सिजन लावण्यापर्यंतची वेळ येते. शरीरात होणाऱ्या कोणत्याही चांगल्या-वाईट बदलांचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर, त्वचेवर आाणि केसांवर होत असतो. त्यामुळे त्वचा निस्तेज दिसणे, डोळे खोल जाणे, वजन कमी होणे, केस मोठ्या प्रमाणात गळणे अशा समस्या निर्माण होतात. या दुष्परिणामांमधून पूर्णत: बाहेर पडायला किमान तीन महिने लागतात. त्यामुळे पोस्ट कोविड ट्रिटमेंटही तितकीच महत्त्वाची असते.
--
कोविडनंतर तीन महिन्यांनी केस गळती
औषधांचा शरीरावर झालेला दुष्परिणाम पुढील महिन्याभरातच दिसायला लागतो. कोविडच नव्हे तर कोणत्याही प्रकारच्या आजारपणानंतर किंवा महिला बाळंत झाल्यानंतरदेखील केस मोठ्या प्रमाणात गळायला लागतात. शरीरातील पोषण कमी झाल्याचा हा परिणाम असतो. पण त्या दरम्यान चांगली काळजी घेतली की नंतर पुन्हा त्याच प्रमाणात नव्याने केस येतात.
--
हे करा
-औषधांमुळे शरीरातील गरमी खूप वाढते ती कमी करण्यासाठी व कमी झालेले पोषण भरून काढण्यासाठी सात्विक आणि समृद्ध आहार घ्या.
-जंक फूड, मसालेदार पदार्थ, चटण्या, लोणची असे पदार्थ टाळा.
-जेवणात, फोडणीत गाईच्या तुपाचा वापर करा.
-हिरव्या भाज्या आणि रसाळ फळे खा. जेवणात कोशिंबीरचे प्रमाण वाढवा.
- रोज किमान ३० मिनिटे चाला. खूप दमणूक करणारे व्यायाम टाळा.
-धातुवर्धक पदार्थ जसे गूळ, गव्हाची खीर, सोयाबीनची खीर, लापशी असे पदार्थ खा.
---
घरगुती उपाय
-आहारासोबतच केसांची निगा राखणेही महत्त्वाचे आहे. आयुर्वेदिक तेलाने केसांना मसाज, वाफ देणे, हार्ड शॅम्पूऐवजी रिठे-शिकेकाईचा वापर करा. तेलात कापूर घालून लावण्याचे केसांची मुळं घट्ट होतात, असे घरगुती उपाय तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता.
---
त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारायचे असेल तर आहार आणि व्यायामावर विशेष लक्ष दिले पाहिजे. कोरोनात झालेली शरीराची हानी भरून काढण्यासाठी आयुर्वेदात शीतवर्धक औषधे, शीरस्त पंचकर्म असे वेगवेगळे उपचार आहेत. शिवाय घरातच दोन तीन महिने चांगली काळजी घेतली तर केस गळण्याचे प्रमाण कमी होते.
डॉ. मंजिरी घेवारी, आयुर्वेद तज्ज्ञ
--