मिरजेतील हैदरखान विहिरीची पुन्हा दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2017 12:49 AM2017-04-09T00:49:51+5:302017-04-09T00:49:51+5:30
लातूरच्या जीवनदायीनीची व्यथा : कचरा टाकण्यासाठी वापर होत असल्याने पाणीसाठा दूषित--लोकमतविशेष
सदानंद औंधे --मिरज -मिरजेतून गतवर्षी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऐतिहासिक हैदरखान विहिरीची दुरवस्था झाली आहे. लातूरला पाणी पाठविण्याचे काम संपल्यानंतर एका वर्षातच या विहिरीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून, हैदरखान विहिरीत झाडे-झुडपे वाढली असून, कचरा टाकण्यात येत असल्याने पाणी दूषित झाले आहे.
मिरजेतून रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी मिरज रेल्वे स्थानकात असलेल्या ऐतिहासिक हैदरखान विहिरीचा मोठा उपयोग झाला होता. कृष्णा नदीतून मिरजेतील रेल्वे स्थानकात हैदरखान विहिरीत पाणीसाठा करून मिरज रेल्वे यार्डातून दररोज ५० टँकरद्वारे लातूरला २५ लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात आला होता. १८ एप्रिलपासून तब्बल १०८ दिवस १७ कोटी लिटर पाणी लातूरला पाठविण्यात आले. मात्र लातूरचा पाणी पुरवठा बंद झाल्यानंतर हैदरखान विहिरीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून, विहिरीत झाडे-झुडपे उगविली आहेत.
विहिरीत मोठ्याप्रमाणात पाणीसाठा असून पाण्यात कचरा टाकण्यात येत आहे. गतवर्षी विहिरीची स्वच्छता करून विहिरीभोवती कुंपण बांधण्यात आले होते. या कुंपणाचीही पडझड झाली आहे. विहिरीचा नवीन नामफलक गायब झाला आहे.
विहिरीतील मोटारी जीवन प्राधिकरण विभागाने काढून नेल्या आहेत. विहिरीचे लोखंडी प्रवेशद्वार मोडकळीस आले आहे. गतवर्षी महापालिका, जीवन प्राधिकरण व रेल्वेने विहिरीची स्वच्छता, साफसफाई केली होती. मात्र विहिरीतील पाणीसाठ्याची गरज संपल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. हैदरखान विहिरीतून एकेकाळी संपूर्ण रेल्वे स्थानकास, रेल्वेगाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. विहिरीतील पाण्याचे स्रोत आजही जिवंत आहेत. रेल्वेने काही वर्षापूर्वी कृष्णा नदीवरून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्यानंतर हैदरखान विहिरीचे महत्त्व कमी झाले. लातूरला जाणारे टँकर भरण्यासाठी जलवाहिनीचे काम करणारे ठेकेदार शशांक जाधव यांनी, हैदरखान विहिरीमुळे लातूरचा पाणीपुरवठा यशस्वी झाल्याचे सांगितले. हैदरखान विहीर नसती, तर पाणीसाठ्यासाठी मोठा हौद तयार करावा लागला असता. या विहिरीचे जतन करणे आवश्यक असल्याचेही जाधव यांनी सांगितले.
पाणीपुरवठा बंद : टॅँकरचेही स्थलांतर
लातूरला पाणी पुरवठ्यासाठी नदीतील जॅकवेल व रेल्वेच्या जलशुध्दीकरण केंद्रात उच्च क्षमतेचे पंप बसवून रेल्वे स्थानकातील हैदरखान विहिरीत पाण्याचा साठा करण्यासाठी ५५ अश्वशक्ती क्षमतेचे तीन पंप बसविण्यात आले. सुमारे ३० लाख लिटर पाण्याचा साठा करण्याची क्षमता असलेल्या हैदरखान विहिरीमुळे गतीने टँकर भरणे शक्य झाले. टँकर भरण्यासाठी सुमारे दोन कोटी रूपये खर्च करून अडीच किलोमीटर लांबीची जलवाहिनी बसविण्यात आली. ही व्यवस्था कायमस्वरूपी ठेवून रेल्वे टँकर भरण्यासाठी या यंत्रणेचा वापर करण्यात येणार होता. मिरजेत पाठविलेले प्रत्येकी ५४ हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टँकर यापुढील काळातही पाणीटंचाई असलेल्या ठिकाणी वापरण्यात येणार होते. मिरजेत पाण्याची सुविधा असल्याने हे टँकर मिरजेतच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र लातूरला पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर पाण्याचे टँकरही मिरजेतून इतरत्र हलविण्यात आले आहेत.
ऐतिहासिक विहिरीचे अस्तित्व धोक्यात
मिरजेतील ऐतिहासिक हैदरखान विहीर १६ व्या शतकात शेतीला पाणीपुरवठ्यासाठी अदिलशहाच्या हैदरखान या सरदाराने बांधल्याचा उल्लेख आहे. या विहिरीतून मिरजेलाही पाणीपुरवठा होत होता. रेल्वेने ही विहीर ताब्यात घेतल्यानंतर रेल्वे स्थानकाला पाणीपुरवठा होत होता. मात्र या मोठ्या बांधीव दगडी हैदरखान विहिरीतील पाणीसाठ्याचा आजही उपयोग करता येणे शक्य असताना, याकडे दुर्लक्षामुळे हैदरखान विहिरीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
१. हैदरखान विहिरीत अजूनही मोठा पाणीसाठा असला तरी, यामध्ये कचरा टाकण्यात येत असल्याने पाणी दूषित होत आहे. २. याठिकाणचे मोटारीचे छत गायब झाले असून, झुडपे वाढली आहेत. ३. विहिरीच्या कुंपणभिंतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत.