कोल्हापूरचे हज यात्रेकरू आज रवाना होणार
By admin | Published: September 13, 2015 12:01 AM2015-09-13T00:01:21+5:302015-09-13T00:01:21+5:30
यापूर्वी गेलेले सर्व यात्रेकरू सुखरूप
कोल्हापूर : कोल्हापुरातून पवित्र हज यात्रेसाठी जाणारी पहिली तुकडी आज, रविवारी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाहून रवाना होणार आहे. या तुकडीत संपूर्ण महाराष्ट्रातून एक हजार जण जाणार असून त्यात कोल्हापुरातील १५१ जणांचा समावेश आहे.
कोल्हापुरातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या दोन तुकड्या करण्यात आल्या असून, पहिली तुकडी आज, रविवारी मुंबई येथून विमानाने रवाना होणार आहे; तर दुसरी तुकडी मंगळवारी (दि. १५) रवाना होणार आहे. महाराष्ट्रातून एकूण १००० हज यात्रेकरू मक्का व मदिना येथे रवाना होणार आहेत. त्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. यामध्ये महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुभेच्छा देताना यात्रेकरूंना महाराष्ट्रासह देशाची अखंडता, बंधुत्व व पावसासाठी दुवा करण्याची विनंती केली. यावेळी महाराष्ट्र हज कमिटीचे चेअरमन हाजी इब्राहिम शेख (भाईजान), माजी मंत्री आरिफ नसीमखान, कर्नाटक जमियत उलेमाए हिंदचे सचिव हाजी इस्माईल पीरजादे, कोल्हापूर हज कमिटीचे हाजी इक्बाल देसाई, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, शाकीर पाटील, अब्दुल रशीद सनदी, आदी उपस्थित होते.