हळदवडेत अनेक कुटुंबे अंधारात : तीन वर्षांपासून वीज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:07 PM2018-06-25T23:07:01+5:302018-06-25T23:07:23+5:30
हळदवडे (ता. कागल) येथील वाढीव वस्तीमधील सुमारे पंधरा कुटुंबांना गेल्या तीन वर्षांपासून महावितरण कार्यालयाकडून वीज जोडणी दिली नसल्याने ही कुटुंबे अंधारातच आहेत.
मुरगूड : हळदवडे (ता. कागल) येथील वाढीव वस्तीमधील सुमारे पंधरा कुटुंबांना गेल्या तीन वर्षांपासून महावितरण कार्यालयाकडून वीज जोडणी दिली नसल्याने ही कुटुंबे अंधारातच आहेत. वेळोवेळी मुरगूड येथील महावितरण कार्यालयात या नागरिकांनी मागणी करूनही महावितरण याकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे या नागरिकांत तीव्र असंतोष पसरला असून आपल्या सर्व कुटुंबीयांसह हे नागरिक महावितरण कार्यालयाच्या दारातच उपोषण करण्याच्या पवित्र्यात आहेत.
केंद्र सरकार व राज्य सरकार सर्व लोकांना वीज दिली म्हणून जाहिरात बाजी करत असताना गेल्या तीन वर्षांपासून कागल तालुक्यातील हळदवडे गावातील सुमारे पंधरा कुटुंब आपल्याला वीज मिळावी म्हणून महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांची मनधरणी करत आहे; पण अद्यापपर्यंत या अधिकाºयांनी या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या आहेत. येथील हळदवडे मधील वाढीव वस्तीमध्ये सुमारे चार वर्षांपासून मोहन गोपाळ इंदलकर, सुशीला लक्ष्मण भोसले, नामदेव दशरथ बैलकर, संदीप दत्तात्रय बैलकर, नामदेव भिवा भराडे, अस्मिता रंगराव भराडे, विलास शिवाजी भराडे, भैरू पांडुरंग बैलकर, बबन शिवाजी भराडे, जोतिराम गोपाळ पोवार, श्रीकांत जोतिराम भराडे, आदी आपल्या कुटुंबासह राहत आहेत.
या नवीन वस्तीच्या ठिकाणी विजेची सोय नाही, त्यामुळे तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने रीतसर महावितरण कार्यालयाकडे याबाबत मागणी केली होती; पण खर्चाचे कारण सांगून महावितरण या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत याबाबत ठराव करून तो महावितरण कार्यालयाला दिला आहे.
याशिवाय खासदार, आमदार यांनीही याठिकाणी तत्काळ वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे, पण तरीही महावितरण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मेणबत्त्या पेटवून प्रशासनाचा निषेध करणार
दरम्यान ग्रामपंचायतीने व नागरिकाने आता लोकशाहीने हा प्रश्न सुटत नसला तर आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये सर्व ग्रामस्थ वीज कार्यालयासमोर मेणबत्त्या पेटवून प्रशासनाचा निषेध करणार आहेत.
यानंतरही जर हळदवडेकरांच्या मागणीचा विचार झाला नाही तर सर्व नागरिक कुटुंबातील सर्व सदस्यांसह वीज कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने हे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत महावितरण कार्यालयाकडे वीज जोडणीबाबत मागणी करत आहे; पण याकडे नको ती कारणे सांगून दुर्लक्ष झाले आहे. आत्ता आम्हाला न्याय मिळवण्यासाठी नाइलाजास्तव आंदोलन करावे लागणार आहे. यानंतर तरी महावितरण कार्यालयाला जाग येते का पाहू.
- जयश्री भराडे, सरपंच हळदवडे, ता. कागल