हळदीची विक्रमी आवक
By admin | Published: March 26, 2017 12:13 AM2017-03-26T00:13:57+5:302017-03-26T00:13:57+5:30
शेतकऱ्यांत समाधान : सरासरी साडेआठ हजार क्विंटलला भाव
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठ दिवसांपासून हळदीच्या आवकेत वाढ होत आहे. आठ दिवसांत तब्बल एक लाख ९४ हजार ६२४ पोत्यांची आवक झाली. त्यामध्ये परपेठेतून आलेल्या ८० हजार पोत्यांचा समावेश आहे. हळदीला सरासरी साडेआठ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. चांगल्या प्रतीच्या हळदीला साडेनऊ हजारपर्यंत भाव मिळत आहे. चांगला भाव मिळत असल्याने जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी माल घेऊन यावे, असे आवाहन सभापती प्रशांत शेजाळ यांनी केले आहे.
यंदा हळदीची लागवड चांगली झाली होती. त्यामुळे उत्पादन वाढले. बाजारपेठेत गेल्या आठ दिवसांत हळदीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सांगलीची बाजारपेठ हळदीसाठी प्रसिद्ध आहे. येथे गतवर्षी सहा लाख पोत्यांची आवक झाली होती. यंदा विक्रमी आवक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील आठ दिवसांत तब्बल एक लाख ९४ हजार ६२४ पोत्यांची आवक झाली. परपेठेतूनही मोठ्या प्रमाणात माल येत असून, सुमारे ८० हजार पोती विक्रीसाठी दाखल झाली आहेत. १८ मार्च रोजी राजापुरी आणि परपेठेतील ३१ हजार ३४० पोती विक्रीसाठी आली. २० मार्चला ३२ हजार, ३१ रोजी १७ हजार ६६८, २२ रोजी ३१ हजार पोती, २३ रोजी २८ हजार २०४, २४ मार्च रोजी २० हजार ८६८ पोत्यांची आवक झाली. राजापुरी हळदीला प्रति क्विंटल सरासरी साडेआठ हजार रुपये, तर परपेठेतील हळदीला सरासरी सात ते साडेसात हजार रुपये भाव मिळत आहे. बाजारपेठेत मालाची आवक वाढली असली तरी, दरामध्ये दर स्थिर असल्याने शेतकरी समाधानी आहेत. (प्रतिनिधी)
पोषक वातावरण : उत्पादनात मोठी वाढ
महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणासह केरळ राज्यातून हळदीची आवक होते. मागील दोन वर्षात हळदीला सरासरी नऊ हजारापासून तेरा हजारापर्यंत भाव मिळाला. चालू वर्षात हळदीच्या पिकासाठी पोषक वातावरण असल्याने उत्पादनात भरमसाठ वाढ होणार आहे. एकरी नऊ ते दहा क्विंटल बियाणे लागत असून, लागवडीसाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येतो. शेतकऱ्यांना एकरी अठरा ते पंचवीस क्विंटल हळदीचे उत्पादन मिळते. येत्या दोन महिन्यात हळदीचा हंगाम सुरू होणार असून, गतवर्षीपेक्षा दुप्पट उत्पादन होणार असल्याचे अटळ आहे. बाजारात हळदीची आवक वाढली असली तरी, दर टिकून आहेत. पुढील आठवड्यातही हळदीची आवक वाढणार असल्याचे सभापती शेजाळ यांनी सांगितले.