कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निम्म्या महिला मतदार, मात्र आतापर्यंत दोनच खासदार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 12:07 PM2024-03-19T12:07:06+5:302024-03-19T12:07:40+5:30
कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुकीचा आणि महिला मतदारांचा विचार करता जवळपास निम्मे महिला मतदार आहेत. परंतु त्या तुलनेत लोकसभेला महिलांना ...
कोल्हापूर: लोकसभेच्या निवडणुकीचा आणि महिला मतदारांचा विचार करता जवळपास निम्मे महिला मतदार आहेत. परंतु त्या तुलनेत लोकसभेला महिलांना अपवाद वगळता अजिबातच संधी मिळाली नाही, असे म्हणावे लागेल. निवेदिता माने या एकमेव कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार असून त्यांना दोन वेळा लोकसभा जिंकून दिल्लीला जाण्याची संधी मिळाली.
लोकसभा निवडणूक लढवणे तितके सोपे नाही. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता विधानसभेला सुध्दा प्रस्थापित आमदारांच्या निधनानंतरच त्यांच्या पत्नीला संधी मिळाली आहे. अन्यथा ठरवून विधानसभेला महिलांना उमेदवारी देण्यात कोल्हापूर जिल्हा पिछाडीवर आहे. हल्ली काही वर्षातील उदाहरणे पाहता आमदार संजय गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी संजीवनीदेवी पोटनिवडणुकीत विजयी झाल्या.
याच पद्धतीने बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीत अशा दोनवेळा संध्यादेवी कुपेकर आमदार झाल्या. कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर जयश्री जाधव पोटनिवडणुकीत विजयी झाल्या.
लोकसभेचा मतदारसंघ हा मोठा असतो. त्यामुळे पक्षीय उमेदवारी आणि त्याला एकसंघ पाठिंबा यामुळेच लोकसभेचा विजय साकार होऊ शकतो. खासदार बाळासाहेब माने यांच्या निधनानंतर १९९६ साली पहिल्यांदा निवेदिता माने या अपक्ष म्हणून काँग्रेसच्या कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याविरोधात रिंगणात उतरल्या. परंतु त्यांचा २ लाख ९ हजार मतांनी पराभव झाला. १९९८ ला पुन्हा या दोघांमध्येच लढत झाली. तेव्हा पुन्हा आवाडे १२ हजार ९१४ मतांनी विजयी झाले. मात्र १९९९ साली राष्ट्रवादीकडून उभ्या राहिलेल्या निवेदिता माने यांनी आवाडे यांचा १२ हजार ८१२ मतांनी पराभव केला आणि त्या कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार बनल्या.
सलग दुसरा विजय
२००४ साली माने यांनी इचलकरंजी मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून डॉ. संजय पाटील यांचा पराभव करत दुसऱ्यांदा खासदार होण्याचा बहुमान मिळवला. २००४ मध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पत्रकार सुनंदा माेरे या शेतकरी कामगार पक्षाकडून रिंगणात होत्या. त्यांना १३ हजार २६६ मते मिळाली. तर २०१९ साली वंचित बहुजन आघाडीकडून कोल्हापूर मतदारसंघातून डॉ. अरुणा माळी उभ्या राहिल्या हाेत्या. त्यांना ६३ हजार ४३९ मते मिळाली.
जिल्ह्यात ४९ टक्के महिला मतदार
कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदारांच्या तुलनेत ४९ टक्के महिला मतदार आहेत. निम्म्या महिला मतदार असूनही निवडणुकीसाठी उमेदवारीमध्ये मात्र महिलांना फारशी संधी नसल्याचे चित्र आहे.
कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदार?
विधानसभा - महिला मतदार
- चंदगड १,५७,२१८
- राधानगरी १,६०,३६१
- कागल १,६२,८३७
- कोल्हापूर दक्षिण १,६९,०७२
- करवीर १,४८,६८५
- कोल्हापूर उत्तर १,४५,९५९
- शाहूवाडी १,४१,७६२
- हातकणंगले १,६०९४१
- इचलकरंजी १,४५,३९६
- शिरोळ १,५७,२५२
- इस्लामपूर १,३२,२३३
- शिराळा १,४३८८२