कोल्हापूर विभागातील सुमारे २७ हजार बेरोजगारांना निम्मा पगार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:12 PM2020-09-15T12:12:42+5:302020-09-15T12:19:10+5:30
कोरोनाच्या संकटामुळे कोल्हापूर विभागातील बेरोजगार झालेल्या सुमारे २७,४२२ जणांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्मी रक्कम मदत म्हणून मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी कामगार राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) सदस्य असणे आवश्यक आहे.
कोल्हापूर : कोरोनाच्या संकटामुळे कोल्हापूर विभागातील बेरोजगार झालेल्या सुमारे २७,४२२ जणांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्मी रक्कम मदत म्हणून मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी कामगार राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) सदस्य असणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या साथीच्या संकटामुळे नोकरी गेल्याने बेरोजगार झालेल्यांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्म्या रकमेची मदत अटल विमा कल्याण योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याअंतर्गत कोल्हापूर विभागातील कितीजणांना मदत होईल, याबाबतचा आढावा लोकमतने घेतला.
कोरोनापूर्वी फेब्रुवारीमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण ३,२८,८४१ कामगारांची भविष्यनिर्वाह निधीची वर्गणी भरण्यात आली होती.
ऑगस्टमध्ये ही संख्या ३,०१,४१९ पर्यंत आली आहे. त्यामुळे या विभागातून २७,४२२ जण बेरोजगार झाले असण्याची शक्यता आहे. त्यांतील जे कामगार हे ईएसआयसीचे सदस्य असतील, त्यांना अटल विमा कल्याण योजनेतून मदत मिळणार आहे.
अशी मिळावा पात्र-अपात्रतेची माहिती
बेरोजगार झालेल्या कामगारांना या अटल विमा कल्याण योजनेतील मदत मिळविण्यासाठी ते पात्र आहेत की, अपात्र हे ईएसआयसी आयपी पोर्टलच्या माध्यमातून जाणून घेता येईल. या पोर्टलवर कामगारांनी त्यांचा १० अंकी विमा क्रमांक नोंदविल्यानंतर त्यांना ही माहिती मिळेल. दर महिन्यात त्यांच्याकडून आणि कंपनीकडून किती रक्कम वर्गणीपोटी ईएसआयसीकडे जमा झाली हेही जाणून घेता येईल.
या योजनेतून मदत मिळविण्यासाठी संबंधित कामगार हे ईएसआयसीचे सदस्य असणे आवश्यक आहे. योजनेची माहिती ईएसआयसी आयपी पोर्टलवर उपलब्ध आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार योजनेबाबतची पुढील कार्यवाही जिल्हा पातळीवर करण्यात येईल.
- सूरज रेवणकर,
शाखा प्रबंधक, ईएसआयसी, कोल्हापूर
असंघटित क्षेत्रात काम करणारे, ईएसआयसी लागू नसणारे, कंत्राटी पद्धतीने काम करणारे अनेकजण कोरोनामुळे बेरोजगार झाले आहेत. स्वयंरोजगार करणाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय केंद्र सरकारने लवकर घ्यावा, या मागणीसाठी लवकरच कामगार संघटना संयुक्त कृती समितीद्वारे निदर्शने केली जाणार आहेत.
- अतुल दिघे,
निमंत्रक, कामगार संघटना संयुक्त कृती समिती
आकडेवारी दृष्टिक्षेपात
- ईएसआयसीकडे नोंदणी असणारे कोल्हापुरातील कामगार : १०७३८१
- भविष्यनिर्वाह निधीत सध्या समावेश असलेले कोल्हापूर विभागातील कामगार : ३०१४१९
- या निधीतून कमी झालेले कामगार : २७४२२