Kolhapur: २० लाखांच्या फसवणूकप्रकरणी अर्धसत्य समोर - नवोदिता घाटगे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 02:36 PM2024-06-28T14:36:45+5:302024-06-28T14:37:03+5:30
'वेगळे वळण देण्याची गरज नाही'
कोल्हापूर : माझी २० लाख रुपयांची फसवणूक झाली याबद्दल ज्या काही चर्चा सुरू आहेत, यातील अर्धसत्य माहिती समोर येत आहे. पोलिस या प्रकरणाचा नक्कीच छडा लावतील; परंतु तोपर्यंत या प्रकरणाला वेगळे वळण देण्याची गरज नाही, असे मत भाजपचे नेते समरजित घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांनी व्यक्त केले. त्या माध्यमांशी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, हा सर्व विषय सायबर क्राइमचा आहे. आम्ही फिर्याद दिली आहे; परंतु ज्या पद्धतीने मला त्यात अडकवण्यात आले आणि माझी फसवणूक झाली, तशीच फसवणूक अन्य कोणाची होऊ नये यासाठीच मी आता पोलिसांनी योग्य तपास करावा यासाठी आग्रही आहे. आम्ही जी फिर्याद दिली आहे, यात सर्व माहिती आहे. पार्सल आणि अन्य गोष्टी खूप प्राथमिक गोष्टी होत्या. त्यामध्ये मनी लाँड्रिंगचाही विषय घेतला. माझ्यासारखी व्यक्ती याच्या आहारी गेली तर सामान्य माणसांनाही याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे याबाबत लोकांना माहिती देण्याचीही गरज आहे.
त्या पुढे म्हणाल्या, शीतल फराकटे यांनी जी माझ्याबद्दल भूमिका मांडली, ती एक महिला म्हणून मी मान्य करते; परंतु या प्रकरणाला वेगळे वळण देण्याची गरज नव्हती. यात समरजित घाटगे यांचा संबंध आणण्याची गरज नाही.
माझे २० लाख रुपये मिळतील
ज्यांच्या सांगण्यावरून शीतल फराकटे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांचे मी आभार मानतो; कारण त्यांच्या या प्रयत्नामुळे माझे २० लाख रुपये मला १०० टक्के परत मिळणार आहेत, असा टोला यावेळी समरजित घाटगे यांनी लगावला.