भाजीपाल्याची आवक निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:19 AM2021-01-09T04:19:19+5:302021-01-09T04:19:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्याचा सर्वाधिक फटका भाजीपाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्याचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, पाच दिवसांत आवक निम्म्यावर आली आहे. त्यामुळे दरात थोडी वाढ दिसत असून, फळ मार्केटवरही पावसाचा परिणाम दिसत आहे.
यंदा ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाने पाठ सोडली नव्हती. त्यामुळे रब्बीसह भाजीपाल्याची पेरणी उशिरा झाली. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. भात कापणी झाल्यानंतर भाजीपाल्याची लागवडही केली. आता भाजीपाला सुरू होतो, तोपर्यंत अवकाळी पावसाने नासाडी करण्यास सुरुवात केली आहे. गेली तीन-चार दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू आहे. मेघगर्जनेसह ढगफुटीसारखा पाऊस कोसळत असल्याने रब्बीसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
कोल्हापूर बाजार समितीतील भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा व गुळाच्या आवकेवर परिणाम झाला आहे. सोमवारी (दि. ४) बाजार समितीत होणाऱ्या भाजीपाल्याच्या आवकेची तुलना केली, तर ती निम्म्यावर आली आहे. कोबी, टोमॅटो, गवारी, कारली, भेंडी या प्रमुख भाज्यांची आवक एकदम कमी झाली आहे. दरातही थोडी वाढ झाली आहे. कांद्याची आवक रोज दोन हजार पिशव्यांनी कमी झाली आहे.
कलिंगडाच्या दरात घसरण
हंगामाच्या सुरुवातीला कलिंगडाला दर चांगला मिळत असल्याने लागवड लवकर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. यंदा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच स्थानिक कलिंगडाची आवक झाली; मात्र अवकाळी पावसाने मातीमोल दराने विक्री करावी लागत आहे.
गुळाचे उत्पादनही घटले
पावसामुळे गुऱ्हाळघरे कशीबशीच सुरू आहेत. त्यामुळे आवक कमी झाली असून, रोज पाचशे गूळ रवे कमी झाले आहेत. आवकेबरोबर मागणीही कमी झाल्याने दरात फारसा चढ-उतार दिसत नाही.