वीकेंड लॉकडाऊनला महामार्गावर धावली अर्धीच वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:22 AM2021-04-12T04:22:21+5:302021-04-12T04:22:21+5:30
शिरोली : कोल्हापूर-सातारा-पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात वीकेंड लाॅकडाऊन असल्याने पुणे-बंगलोर महामार्गावरील वाहतूक ही मंदावलेली दिसली. शुक्रवारी रात्री १२ ते शनिवारी ...
शिरोली : कोल्हापूर-सातारा-पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात वीकेंड लाॅकडाऊन असल्याने पुणे-बंगलोर महामार्गावरील वाहतूक ही मंदावलेली दिसली. शुक्रवारी रात्री १२ ते शनिवारी रात्री १२ या वेळेत नऊ हजार वाहनांनी प्रवास केला आहे. सुमारे ४५ टक्के वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले आहे.
राज्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईनंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरलासुद्धा गेल्या पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. ही साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात शनिवार, रविवारी वीकेंड लाॅकडाऊन सुरू केले आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवासी आणि जे स्थानिक शेजारच्या जिल्ह्यात प्रवास करणारे सर्व प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने घरीच थांबल्याचे दिसत आहेत.
पुणे- बंगलोर महामार्गावरून दररोज सुमारे २० ते २१ हजार वाहने धावतात.
पण, वीकेंड लाॅकडाऊनच्या काळात शुक्रवारी रात्री १२ ते शनिवारी रात्री बारापर्यंत महामार्गावरून धावणाऱ्या सुमारे नऊ हजार वाहनांची नोंद महामार्गावर झाली आहे.
केरळ पासून कन्याकुमारीपर्यंत दररोज धावणारी हजारो वाहनांची चाके मंदावलेली दिसली. कारण पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी मुख्य बाजारपेठा बंद आहेत. ट्रान्सपोर्ट व्यवसाय मोठा आहे. सतत वाहनांची रेलचेल दिसते. दळणवळण मोठ्या प्रमाणावर आहे.
प्रमुख शहरात पुन्हा लाॅकडाऊन सुरू झाल्याने कायम महामार्गावरून वाऱ्याच्या वेगाने धावणारी मालवाहतूक वाहने, ट्रक, टॅम्पो, लक्झरी बसेस, आलिशान चारचाकी गाड्याही सर्व वाहतूक आणि गाड्यांची चाके मंदावलेली दिसत आहेत. यातून मेडीकल, दवाखाने, दूध, भाजीपाला, रुग्णवाहिका अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने धावताना दिसत होती, तर कोल्हापूर-सोलापूर राज्यमार्गावर शुकशुकाट दिसत होता. कोल्हापूर, सांगली, मिरज, इचलकरंजी, सोलापूर, पंढरपूर, रत्नागिरी या शहरासाठी या राज्यमार्गावरून दररोज शेकडो वाहने धावत असतात; पण वीकेंड लाॅकडाऊन जाहीर केल्याने वाहने धावताना दिसली नाहीत.
फोटो ओळी : १) लाॅकडाऊनमुळे पुणे-बंगलोर महामार्गावरील वाहतूक तुरळक होती.
(फोटो-सतीश पाटील शिरोली)