अर्ध्यावरती डाव मोडला...अधुरी एक...
By admin | Published: December 27, 2014 12:28 AM2014-12-27T00:28:04+5:302014-12-27T00:33:48+5:30
फराकटेवाडी येथील घटना : पत्नीच्या ओटीभरणी कार्यक्रमाच्या धावपळीतच जवानाचा मृत्यू
बोरवडे : माणसाच्या जीवनाची वाटचाल नियत ठरवत असते. नियतीच्या नियमापुढे कोणाचेही चालत नाही. त्यांच्या लग्नाला अवघी दीड वर्षे झालेली. पत्नीच्या ओटीभरणी कार्यक्रमासाठी म्हणून तो घरी आला. घरातच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. आणि त्याचा दीड वर्षाचा संसार संपला. अर्ध्यावरती डाव मोडला.... अशीच कहाणी त्याच्या जीवनाची झाली.
फराकटेवाडी (ता. कागल) येथील अनिल जोती पाटील हा युवक घरच्या गरिबीवर मात करून २००५ मध्ये पुणे येथे सीआरपीएफ (जीवन बटालियन) मध्ये भरती झाले. आयुष्याच्या जोडीदाराची स्वप्ने रंगवत असतानाच दीड वर्षापूर्वी ते लग्नाच्या बेडीत अडकले. पत्नी सहा महिन्यांची गर्भवती आहे. दोन दिवसांपूर्वी पत्नीच्या ओटीभरणी कार्यक्रमासाठी पुणे येथून दहा दिवसांच्या सुटीवर ते आले. कार्यक्रम संपन्न वातावरणात पार पाडायचा या तयारीत असतानाच काल, गुरुवारी दुपारी त्यांच्या छातीत दुखायला लागले. धावपळीच्या त्रासाने असेल म्हणून त्याकडे थोडं दुर्लक्ष झाले. गुरुवारी सायंकाळी जोरदार झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
पत्नी सात महिन्यांची गरोदर असताना जीवनाचा रथ हाकण्याची साथ घेतलेल्या या दाम्पत्याला अखेर नियतीपुढे झुकावे लागले. आले देवाच्या मना तेथे .... या म्हणी प्रत्यक्ष अनुभव फराकटेवाडी ग्रामस्थांना पहायला मिळाला. घडलेल्या या प्रसंगाने सारेच ग्रामस्थ अस्वस्थ झाले. जीवनाची अखंड साथ देण्याचे वचन दिलेल्या त्यांच्या पत्नी व कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी घरी गर्दी झाली होती. पाटील यांच्या पश्चात वडील, भाऊ असा परिवार आहे.