अर्ध्यावरती प्रकल्प रखडले...अधुरी सारी कहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 01:22 AM2017-08-08T01:22:31+5:302017-08-08T01:25:26+5:30
कोल्हापूर : केवळ आणि केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावापोटी आजरा आणि भुदरगड तालुक्यातील पाच प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही पाण्याचा एकही थेंब अडलेला नाही. २0-२0 वर्षे होऊनही, प्रकल्पांच्या खर्चात पाचपट वाढ होऊनही काही ना काही कारणाने या प्रकल्पांच्या पदरात सध्यातरी वांझोटेपण पडले आहे.
समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केवळ आणि केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावापोटी आजरा आणि भुदरगड तालुक्यातील पाच प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही पाण्याचा एकही थेंब अडलेला नाही. २0-२0 वर्षे होऊनही, प्रकल्पांच्या खर्चात पाचपट वाढ होऊनही काही ना काही कारणाने या प्रकल्पांच्या पदरात सध्यातरी वांझोटेपण पडले आहे. यातील तीन प्रकल्प हे ‘मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम’मधील असून आज, मंगळवारी याबाबत मुंबईत बैठक होत आहे. केवळ आंदोलने झाली, निवेदने दिली म्हणून बैठकीची औपचारिकता न राहता ठोस निर्णयाची अपेक्षा आहे.
१९९५ नंतर राज्यात सत्तेवर आलेल्या तत्कालीन भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने कृष्णा खोरे प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक प्रकल्पांची कामे सुरू केली. मात्र, सिंचन प्रकल्पामध्येच वादग्रस्त ठरलेल्या दोन्ही काँग्रेसचे सरकार नंतर तीनवेळा सत्तेवर येऊन गेले तरी त्यांना हे प्रकल्प पुरे करता आले नाहीत, हे वास्तव आहे. आता पुन्हा युतीचे सरकार येऊन तीन वर्षे झाल्यानंतर याबाबत हालचालींना सुरुवात झाली आहे. दरम्यानच्या काळात या प्रकल्पांच्या वाढलेल्या कि मती, यातून निर्माण होणाºया सिंचन क्षमतेत झालेली दिरंगाई यामुळेच या परिसरातील शेतकºयांवर शेतीच्या पाण्यासाठी पुन्हा पावसावरच अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
यातील उचंगी आणि आंबेओहोळ प्रकल्पांसाठी आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी अधिवेशनावेळी निदर्शने केली; परंतु त्यांची सत्ता असताना हे प्रकल्प त्यांनी मार्गी लावले असते तर मुश्रीफ यांच्याच भाषेत त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली गेली असती. माजी आमदार कै. तुकाराम कोलेकर, वाटंगीच्या अल्बर्ट डिसोझा यांनी उचंगीसाठी जसा वाईटपणा घेतला, शिव्याशाप घेतले तसा वाईटपणा घ्यायला कुणी फारसे तयार न झाल्याने हे प्रकल्प रखडले.
एकीकडे राजकीय इच्छाशक्ती कमी पडली असताना दुसरीकडे शासनही प्रकल्पग्रस्तांना आम्ही तुमच्या भल्यासाठी वाट्टेल ते करू, असा विश्वास देण्यात कमी पडले. प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्याऐवजी त्यांच्याच जमिनी खोटी कागदपत्रे रंगवून राजकीय नेत्यांना विकण्याचा हरामखोरपणा काही महसूल अधिकाºयांनी केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा त्यांच्यावरही विश्वास राहिलेला नाही.
पाठपुरावा आवश्यक
निवडणुकांसाठी मते आवश्यक असल्याने जमिनी काढून घेतल्या तर मतदारांची नाराजी, लाभधारकांच्या अतिरिक्त जमिनी काढून घेतल्या तरीही नाराजी ती पत्करण्याचे धाडस अनेकांनी न दाखविल्याने या प्रकल्पांना कुणी वालीच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. कै. बाबासाहेब कुपेकर यांनी चित्रीच्या बाबतीत जसा पाठलाग केला तसा अन्य प्रकल्पांबाबत झाला नाही.
उचंगी प्रकल्प १५ कोटींवरून ५९ कोटींवर
प्रकल्पस्थळ उचंगी, ता. आजरा
पहिली प्रशासकीय मंजुरी १३ डिसेंबर १९९६
मूळ खर्च १५ कोटी १२ लाख
येणारा सुधारित खर्च ५८ कोटी ७३ लाख
होणारा पाणीसाठा १७.४८ द.ल.घ.मी.
सिंचनक्षमता २५१९ हेक्टर
लाभ होणारे तालुके आजरा, गडहिंग्लज
पुनर्वसन स्थिती अपूर्ण
आवश्यक निधी २१ कोटी रुपये
आंबेओहोळकडे कमालीचे दुर्लक्ष
प्रकल्पस्थळ उत्तूर ता. आजरा
पहिली प्रशासकीय मंजुरी १६ आक्टोबर १९९८
मूळ खर्च २९ कोटी ३१ लाख
येणारा सुधारित खर्च २२७ कोटी ५४ लाख
होणारा पाणीसाठा ३५.११ द.ल.घ.मी.
सिंचनक्षमता ६३४२ हेक्टर
लाभ होणारे तालुके आजरा, गडहिंग्लज
पुनर्वसन स्थिती अपूर्ण
आवश्यक निधी १२0 कोटी रुपये
३३ कोटींचा सर्फनाला प्रकल्प १४६ कोटींवर
प्रकल्पस्थळ पारपोली, ता. आजरा
पहिली प्रशासकीय मंजुरी आक्टोबर १९९८
मूळ खर्च ३३ कोटी रुपये
येणारा सुधारित खर्च २२१ कोटी १८ लाख रुपये
होणारा पाणीसाठा .६७ टीएमसी
सिंचनक्षमता ३७८४ हेक्टर
लाभ होणारे तालुके आजरा
पुनर्वसन स्थिती अपूर्ण
आवश्यक निधी ८२ कोटी रुपये
नागनवाडी प्रकल्प १७ वर्षे होतोयच
प्रकल्पस्थळ बारवे दिंडेवाडी, ता. भुदरगड
पहिली प्रशासकीय मंजुरी जानेवारी २000
मूळ खर्च १२ कोटी ९३ लाख रुपये
येणारा सुधारित खर्च ४0 कोटी ८८ लाख रुपये
होणारा पाणीसाठा .२९९ टीएमसी
सिंचनक्षमता १0६५ हेक्टर
लाभ होणारे तालुके भुदरगड, कागल
पुनर्वसन स्थिती अपूर्ण
आवश्यक निधी २५ कोटी रुपये
धामणी प्रकल्प खर्चात ६६२ कोटींची वाढ
प्रकल्पस्थळ राई ता. राधानगरी
पहिली प्रशासकीय मंजुरी डिसेंबर १९९६
मूळ खर्च १२0 कोटी ३0 लाख रुपये
येणारा सुधारित खर्च ७८२ कोटी ३७ लाख रुपये
होणारा पाणीसाठा १७.४८ द.ल.घ.मी.
सिंचनक्षमता ३.८५ टीएमसी
लाभ होणारे तालुके राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा
पुनर्वसन स्थिती अपूर्ण
आवश्यक निधी ४00 कोटी रुपये