हमाली वाढीवरून बैठकीत खडाजंगी : काम बंद केल्याने तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 01:26 PM2019-11-12T13:26:10+5:302019-11-12T13:28:31+5:30
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील गूळ खरेदीदार व त्यांच्याकडील हमाल यांच्यात हमाली वाढीवरून सोमवारी झालेल्या बैठकीत जोरदार खडाजंगी उडाली. एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने तणाव निर्माण झाला. वाद वाढतच गेल्याने हमालांनी दुपारनंतरचे काम बंद केल्याने पेच निर्माण झाला आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील गूळ खरेदीदार व त्यांच्याकडील हमाल यांच्यात हमाली वाढीवरून सोमवारी झालेल्या बैठकीत जोरदार खडाजंगी उडाली. एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने तणाव निर्माण झाला. वाद वाढतच गेल्याने हमालांनी दुपारनंतरचे काम बंद केल्याने पेच निर्माण झाला आहे.
गूळ विभागात खरेदीदारांकडे सुमारे ३५० हमाल कार्यरत आहेत. गुळाचा सौदा झाल्यानंतर रव्यांची शिलाई करणे, शिक्का मारणे आणि त्याची वाहतूक करण्याचे काम हे हमाल करतात. त्यासाठी रव्यामागे ५ रुपये ३० पैसे त्यांना हमाली दिली जाते.
खरेदीदार व हमाल यांच्यात २०१५ रोजी झालेल्या समझोता करारानुसार हमालीमध्ये दरवर्षी १० टक्के वाढ होते. सप्टेंबर ते आॅक्टोबर हा गूळ विभागाचा हंगाम गृहीत धरून आॅक्टोबरमध्ये वाढ दिली जाते; पण यंदा दोन महिन्यांपूर्वीच खरेदीदारांनी वाढ देणार नसल्याचे समितीला कळविले होते. वाढ दिली नाहीतर शुक्रवार (दि. १५)पासून काम बंद आंदोलनाचा इशारा हमाल संघटनेने दिला होता.
याबाबत सोमवारी दुपारी समितीत खरेदीदार व हमालांची बैठक घेण्यात आली. चर्चा सुरू असतानाच खरेदीदार आणि हमालांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली. त्यातून कामगार प्रतिनिधीच्या अंगावर काही खरेदीदार धावून गेल्याने गोंधळ उडाला. त्यातून एकमेकांच्या अंगावर गेल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.
अखेर समितीचे सभापती बाबासो लाड, सचिव मोहन सालपे यांनी मध्यस्थी करीत दोघांना शांत केले; पण त्या रागातून हमालांनी दुपारपासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, याबाबत खरेदीदार प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, याबाबत आपण काहीच बोलणार नसल्याचे सांगितले.
उद्या सौद्याचे भवितव्य अधांतरी!
आज, मंगळवारी गूळ मार्केटला सुट्टी आहे. त्यामुळे उद्या, बुधवारी सकाळी गुळाचा सौदा होणार का? याबाबत साशंकता आहे. हमाल व खरेदीदार आपआपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर पेच निर्माण होऊ शकतो.
कराराप्रमाणे दरवाढीची मागणी आम्ही केली, पण ती दिली नाही. याबाबत समितीने बोलाविलेल्या बैठकीत कामगार प्रतिनिधीच्या अंगावर खरेदीदार धावून गेले. उद्या हमालांना मारहाण करण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत. त्या रागातून हमालांनी दुपारपासून काम बंद केले.
- बाबूराव खोत ,
संचालक, बाजार समिती
शेतकरी अगोदरच संकटात आहेत. त्यांच्या हिताचा विचार करून खरेदीदार आणि हमालांनी हा विषय फार ताणू नये. एकत्रित बसून तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.
- मोहन सालपे,
सचिव, बाजार समिती