‘हमीदवाडा’,‘बिद्री’ची महिन्याभरात रणधुमाळी
By admin | Published: April 27, 2017 12:51 AM2017-04-27T00:51:52+5:302017-04-27T00:51:52+5:30
राजकीय हालचाली गतिमान : वाढीव सभासदांबाबत साखर सहसंचालक कार्यालयाकडून छाननी पूर्ण
कोल्हापूर : सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना, हमीदवाडा व दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री या दोन कारखान्यांची रणधुमाळी येत्या महिन्याभरात सुरू होणार आहे. ‘हमीदवाडा’ कारखान्यासाठी संस्थांकडून ठराव पाठविण्याची मुदत ५ मेपर्यंत आहे, तर ‘बिद्री’च्या वाढीव सभासदांची छाननी महसूल विभागाकडून सुरू आहे. दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकीचे वातावरण कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यांत तापू लागले असून, राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
‘बिद्री’च्या वाढीव सभासदांबाबत साखर सहसंचालक कार्यालयाकडून छाननी होऊन महसुली तपासणीसाठी राधानगरी, करवीर, भुदरगड, कागल तालुक्यांतील संबंधित तलाठ्यांकडे दिलेली आहे. येत्या पंधरा दिवसांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
‘हमीदवाडा’ची प्रक्रिया साखर सहसंचालक कार्यालयाने सुरू केली असून संलग्न संस्थांचे प्रतिनिधी ठराव मागविले आहेत. आतापर्यंत १८१ पैकी ६६ संस्थांनी आपल्या प्रतिनिधींच्या नावे ठराव दाखल केले आहेत. उर्वरित संस्थांसाठी ५ मेपर्यंत मुदत असून त्यानंतर संस्था गटांची यादी प्रसिद्ध करून त्यावर हरकती घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मतदार यादी प्रसिद्ध केल्यापासून २५ दिवसांत अंतिम यादी आणि त्यानंतर दहा दिवसांचा निवडणूक कार्यक्रम राबविला जातो. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या पश्चात पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. कागलमधील सर्वच गटांनी निवडणूक ‘बिनविरोध’ करण्याचे आश्वासन दिले असले तरी कागल हे ‘राजकीय विद्यापीठ’ आहे. त्यामुळे ऐनवेळी काहीही होऊ शकते.
मंडलिक यांच्या गाठीभेटी
‘हमीदवाडा’ कारखान्याचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी कार्यक्षेत्रातील गावात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी २० ते २५ गावांत दौरा करून निवडणुकीची तयारी केली आहे.
दृष्टिक्षेपात ‘हमीदवाडा’
उत्पादक सभासद - २५६१०
संस्था सभासद - १८१
संचालक मंडळ संख्या - २१
गट - मुरगूड, कसबा सांगाव, कागल, बिद्री-बोरवडे, चिखली, सेनापती कापशी.