कुरुंदवाडमध्ये अतिक्रमणावर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:50 AM2017-08-03T00:50:46+5:302017-08-03T00:50:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुंदवाड : येथील माळभागावरील मुख्य रस्त्यावर गाळेधारकांनी केलेले अतिक्रमण नगरपालिकेने हटविले. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. दरम्यान, गाळेधारक व अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधिकारी यांच्यात वादावादी झाली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र, अधिकाºयांनी कोणताही दबाव न घेता अतिक्रमण हटविल्याने समाधान व्यक्त होत आहे.
माळभागावरील प्रतापसिंह उद्यानाभोवती नगरपालिकेने गाळे बांधून व्यावसायिकांना दिले आहेत. मात्र, व्यावसायिकांनी गाळ्याइतकेच पुढे अतिक्रमण केल्याने व गाळे लगत असणारी गटारी बुजविल्याने रस्ता अरुंद बनला होता. हा राज्य मार्ग असल्याने या मार्गावरून मोठी वाहतूक असते. मात्र, या मार्गावर अतिक्रमण झाल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे या मार्गावरील अतिक्रमण पालिकेने हटवावे, अशी मागणी होत होती.
सकाळी अकरा वाजता नगरपालिकेने माळभागावरील अतिक्रमण हटाव मोहीम चालू केली. बांधकाम अभियंता विजय माळी व शशिकांत पोवार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविली. नगरपालिकेने बांधलेल्या गटारींवर व्यावसायिकांनी केलेले बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढले. यावेळी माजी नगरसेवक लियाकत बागवान यांनी अभियंता विजय माळी यांना सायंकाळपर्यंत अतिक्रमण काढण्यासाठी मुदत मागितली. मात्र, अभियंता माळी यांनी नकार दिल्याने त्यांच्यात वादावादी झाली.
पथकाने मोहीम चालूच ठेवल्याने नाइलाजाने व्यावसायिकांनी अतिक्रमण काढून घेतले. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे प्रवासी, पादचाºयांतून समाधान व्यक्त होत आहे. मोहिमेत अजित दीपंकर, शशिकांत कडाळे, राजू गोरे, निशिकांत ढाले, नंदकुमार चौधरी, अभिजित कांबळे, अमोल कांबळे, सचिन थरकार, मिरासो मुल्ला यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.