सांगली, कुपवाडच्या अतिक्रमणांवर हातोडा

By admin | Published: January 7, 2016 12:07 AM2016-01-07T00:07:06+5:302016-01-07T00:41:02+5:30

मोहीम तीव्र : जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडून पाहणी; १३२ जणांवर कारवाई

Hammer on the encroachment of Sangli, Kupwara | सांगली, कुपवाडच्या अतिक्रमणांवर हातोडा

सांगली, कुपवाडच्या अतिक्रमणांवर हातोडा

Next

सांगली : महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने बुधवारी कारवाईचा धडका कायम ठेवला. सांगलीतील शंभरफुटी रस्ता व कुपवाडमधील तब्बल १३२ अतिक्रमणावर हातोडा टाकण्यात आला. शंभरफुटी रस्त्यावर अतिक्रमण हटविताना सुरुवातीला वादावादी झाली. पण नंतर मात्र दुकानदारांनी स्वत:हूनच अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.
महापालिका हद्दीतील प्रमुख रस्ते, फुटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून महापालिकेने अतिक्रमणाविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली नव्हती. त्याचा फायदा फळ, भाजी विक्रेते, दुकानदार, व्यापाऱ्यांनी घेतला होता. महापालिकेच्या आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे येताच त्यांनी अतिक्रमणाविरोधात मोहीम हाती घेतली. मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणांवर हातोडा टाकल्यानंतर आता शंभरफुटी रस्त्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
बुधवारी दुपारी शंभरफुटी रस्त्यावरील ४७ अतिक्रमणे काढण्यात आली. नगररचना विभागाचे संजय कांबळे व त्यांच्या पथकाने शंभर फूट रस्त्याचे मार्किंग केले. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. मार्किंगच्या आतील मातीचा भराव, कठडे, छपऱ्या काढून टाकण्यात आल्या. यावेळी काही गाळेधारकांनी वाद घातला. त्यानंतर मात्र स्वत:हून अनेक दुकानदारांनी अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली.
सायंकाळी जिल्हाधिकारी गायकवाड यांनी शंभरफुटी रस्त्याची पाहणी केली. रस्त्याच्या दक्षिणेला विजेचे खांब आहेत. हे खांब हटविल्यास अतिक्रमणाला बऱ्यापैकी चाप लागू शकतो. त्यासाठी गायकवाड यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. महापालिकेने २००७ साली खांब हटविण्याचा प्रस्ताव दिला होता. पण तो धूळ खात पडला आहे. यावर मंगळवारी बैठक घेण्याचे आदेश त्यांनी दिले. शंभरफुटी संपूर्ण रस्ता वापरात आला पाहिजे, त्यादृष्टीने तातडीने मुरूमीकरण, डांबरीकरणाची प्रक्रिया हाती घेण्याची सूचनाही केली.
महापालिकेच्या पथकाने सकाळी कुपवाडमध्ये अतिक्रमण हटावाचा मुहूर्त केला. आंबा चौक, वसंतदादा सूतगिरणी, मुख्य चौक, पाण्याची टाकी परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. ८५ अतिक्रमणांवर हातोडा टाकण्यात आला. गुरुवारी शंभरफुटी रस्त्यावरील अतिक्रमणे काढणार असल्याचे सहाय्यक आयुक्त वाघमारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


कुपवाड कारवाई : वरिष्ठांना कल्पनाच नाही
कुपवाडमधील आंबा चौक, वसंतदादा सूतगिरणी, मुख्य चौकातील अतिक्रमणेही बुधवारी हटविण्यात आली. पण त्याची पूर्वकल्पना उपायुक्तांना देण्यात आली नव्हती. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कुपवाडचे सहायक आयुक्त अतिक्रमण काढण्याबाबत सक्षम असावेत, म्हणून त्यांनी मोहिमेबाबत वरिष्ठांना कल्पना दिली नसेल, अशी खोचक प्रतिक्रिया दिली.

Web Title: Hammer on the encroachment of Sangli, Kupwara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.