गांधीनगरात मुख्य रस्त्यावरील अवैध बांधकामांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:30 AM2021-02-25T04:30:16+5:302021-02-25T04:30:16+5:30
गांधीनगर : गांधीनगर येथील मुख्य रस्त्यावरील वळीवडे हद्दीतील बेकायदेशीररित्या सुरू असणाऱ्या दोन बांधकामांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी कारवाई करत ...
गांधीनगर : गांधीनगर येथील मुख्य रस्त्यावरील वळीवडे हद्दीतील बेकायदेशीररित्या सुरू असणाऱ्या दोन बांधकामांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी कारवाई करत सुरू असणारी बांधकामे जेसीबीच्या साह्याने पाडून टाकली. गांधीनगरच्या मुख्य रस्त्यावरील वळीवडे ( ता.करवीर) हद्दीतील रोशन पंजवानी व विजय लालवाणी यांनी मुख्य रस्त्यालगत अवैधरित्या बांधकाम सुरू केले होते. रस्त्याच्या मध्यापासून ३० मीटरच्या आत बेकायदेशीर बांधकामे सुरू न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असून, तो आदेश डावलून ही बांधकामे सुरू होती. सूचना करूनही ही बांधकामे सुरूच ठेवल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात ही बांधकामे पाडून टाकली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी इंगवले यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अवैधरित्या सुरू असणारी बांधकामे जैसे थे ठेवण्याचे आदेश आहेत. पण तो आदेश डावलून बांधकामे सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. भविष्यात कोणीही बेकायदेशीर बांधकामे करू नयेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कारवाईवेळी विभागाचे सहायक अभियंता श्रीकांत सुतार, संजय माळी, शिवाजी वावरे उपस्थित होते.
फोटो : २४ गांधीनगर बांधकाम कारवाई
ओळ :गांधीनगरच्या मुख्य रस्त्यावरील वळीवडे हद्दीतील बेकायदेशीररित्या सुरू असणारे अवैध बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने पाडून टाकले.