कोणत्याही क्षणी पडणार भंगार बाजारावर हातोडा
By admin | Published: December 31, 2016 11:55 PM2016-12-31T23:55:33+5:302016-12-31T23:56:59+5:30
मुदत संपली : मनपाकडून तयारी पूर्र्ण; खर्च वसूल करण्याचा इशारा
नाशिक : चुंचाळे शिवार व अंबड-लिंकरोडवरील अनधिकृत भंगार बाजार हटविण्यासंबंधी महापालिकेने दिलेली पंधरा दिवसांची मुदत ३१ डिसेंबरला संपुष्टात आली. त्यामुळे आता भंगार बाजारावर कधीही हातोडा पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेने भंगार बाजार हटविण्याबाबत तयारी पूर्ण केली आहे. महापालिकेने अंबड-लिंकरोडवर अनधिकृतपणे वसलेल्या भंगार बाजारावर कारवाईसंबंधीची नोटीस पंधरा दिवसांपूर्वी बजावली होती. प्रत्यक्ष भंगार बाजाराच्या ठिकाणी फलक लावून व्यावसायिकांना कारवाईची पूर्वसूचना दिली. पंधरा दिवसांच्या आत व्यावसायिकांनी भंगार बाजार स्वत:हून हटवावा अन्यथा त्यांच्याकडून कारवाईचा खर्च वसूल केला जाईल, असा इशाराही महापालिकेने दिलेला आहे. दरम्यान, पंधरा दिवसांची मुदत शनिवार, दि. ३१ डिसेंबरला संपली. त्यामुळे महापालिकेकडून आता कोणत्याही क्षणी भंगार बाजारावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी अंबड पोलिसांनी व्यावसायिकांना बोलावून त्यांना कारवाईची माहिती दिली, तर शनिवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या दालनात अधिकाºयांची बैठक होऊन कारवाईच्या तयारीवर अंतिम हात फिरविण्यात आला. यावेळी सात पथकांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच कोणत्या ठिकाणाहून कारवाई सुरू करायची याचेही नियोजन करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनाही पत्र देऊन बंदोबस्ताबाबतची कल्पना देण्यात आली आहे. महापालिकेने कारवाईसाठी २ जानेवारी ही तारीख निश्चित केली होती, परंतु शहरात सुरू होणारे महाआरोग्य अभियान, त्यानिमित्त मंत्र्यांचे दौरे यामुळे कारवाई तूर्त काही दिवस लांबण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)