जिल्हा क्रीडा अधिकारी आंदोलकांमध्ये हमरीतुमरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:20 AM2020-12-08T04:20:15+5:302020-12-08T04:20:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील शासनाचा जलतरण तलाव खुला करावा या मागणीसाठी सोमवारी कोल्हापूर शहर ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील शासनाचा जलतरण तलाव खुला करावा या मागणीसाठी सोमवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे येथे आंदोलन करण्यात आले. मात्र, यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी तलाव खुला असून आंदोलन बेकायदेशीर असल्याचा दावा केला. यावरून आंदोलक आणि डॉ. साखरे यांच्यामध्ये चांगलीच तू तू-मैं मैं झाली.
अनलॉकच्या विविध टप्प्यांमध्ये जलतरण खुला करण्यास शासनाने मान्यता दिली होती. त्यानुसार शहरातील शासनाचा एकमेव जलतरण तलाव खुला करण्याची मागणी करण्यात आली होती, तर क्रीडा कार्यालयातर्फे १ डिसेंबर रोजी तलाव खुला करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप तलाव खुला न झाल्याचा आरोप करत कृती समितीतर्फे सोमवारी दुपारी घोषणाबाजी करत तलावामध्ये प्रवेश करण्यात आला, तर त्यांच्या सोबतच्या खेळाडूंनी तलावामध्ये जलतरणाचा सराव केला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे दाखल झाले. त्यांनी शासनाच्या नियमावलीनुसार १ डिसेंबर रोजी तलाव खुला करण्यात आल्याचा दावा केला. यावरून आंदोलक आणि जिल्हा क्रीडा अधिकारी साखरे यांच्यामध्ये शाब्दिक वाद रंगला. तलाव सुरू असताना तसेच कोणतीही पूर्वकल्पना न देता करण्यात आलेले हे आंदोलनच बेकायदेशीर असल्याची भूमिका घेतली, तर कृती समितीचे रमेश मोरे आणि अशोक पोवार यांनी आंदोलन बेकायदेशीर असल्यास गुन्हा दाखल करून कारवाई करा. त्यानंतर तलाव खुला करण्याबाबतचे निवेदन क्रीडा अधिकाऱ्यांकडे देण्यात आले. शासनाच्या नियमावलीनुसार तलाव खुला असल्याचे पत्र देण्याचे क्रीडा अधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यानंतर आंदोलक शांत झाले.
आंदोलनात संभाजीराव जगदाळे, राजेश वरक, श्रीकांत भोसले, रामदास भाले, महादेव जाधव, चंद्रकांत पाटील, कादर मलबारी, रामभाऊ कोळेकर, दिग्विजय साळोखे, विजय पाटील, श्रीवर्धन पाटील, अस्मिता म्हाकवे, अनुष्का भोसले, धैर्यशील भोसले, पंडित ठमके, गिरीजा मोरे, हर्षाली मोरे, श्रीधन जाधव, अंजूम देसाई, राजेंद्र कोतमिरे, महेश जाधव, आदींनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला.
(फोटो स्वतंत्र देत आहे )