पदवीधरसाठी राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 04:44 PM2020-07-29T16:44:18+5:302020-07-29T16:50:27+5:30

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर पडली असली तरी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये इच्छुकांची मांदियाळी पाहावयास मिळते. तब्बल डझनभर तगडे चेहरे इच्छुक असून, आघाडीची उमेदवारी मिळणार असल्याने विजयापेक्षा उमेदवारीसाठीच प्रत्येकाने सर्वस्व पणाला लावले आहे. याउलट भाजपमध्ये अद्याप सावध हालचाली सुरू आहेत.

A handful of aspirants to the NCP for graduates | पदवीधरसाठी राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मांदियाळी

पदवीधरसाठी राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मांदियाळी

googlenewsNext
ठळक मुद्देआघाडीमुळे विजयापेक्षा उमेदवारीसाठीच सर्वस्व पणाला भाजपकडून मात्र अद्याप सावध भूमिका

राजाराम लोंढे

कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर पडली असली तरी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये इच्छुकांची मांदियाळी पाहावयास मिळते. तब्बल डझनभर तगडे चेहरे इच्छुक असून, आघाडीची उमेदवारी मिळणार असल्याने विजयापेक्षा उमेदवारीसाठीच प्रत्येकाने सर्वस्व पणाला लावले आहे. याउलट भाजपमध्ये अद्याप सावध हालचाली सुरू आहेत.

गेल्या ३० वर्षांत पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. २००२ ला जनता दलाचे प्रा. शरद पाटील यांचा अपवाद वगळता २४ वर्षे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच प्रतिनिधित्व केले. मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीमध्ये निकराची झुंज झाली आणि चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. मात्र राष्ट्रवादीत अरुण लाड यांची बंडखोरी होऊनही नवखे सारंग पाटील यांनी घेतलेली मते पाहता, भाजपचा बालेकिल्ला २०२० ला अडचणीत येणार हे त्याचवेळी निश्चित झाले होते. त्यानुसार सारंग पाटील यांनी गेली पाच वर्षे राष्ट्रवादीच्या माध्यमातून पदवीधरांचे मोट बांधली.

जून २०२० मध्ये पदवीधरची निवडणूक होणार होती, मात्र कोरोनामुळे ती लांबणीवर पडली. तत्पूर्वी चंद्रकांत पाटील हे कोथरूड (पुणे) येथून विधानसभेवर गेल्याने त्यांचे वारसदार कोण? याची चर्चा होती. सारंग पाटील यांची तयारी पाहता पदवीधरमध्ये सारंग पाटील यांच्या विरोधात भाजपकडून कोण? हीच चर्चा गेले तीन-चार महिने सुरू होती.

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत अनपेक्षितपणे श्रीनिवास पाटील यांना संधी मिळाली. दोन्ही पदे एकाच घरात देणे कितपत योग्य आहे? त्याशिवाय सातारा लोकसभा मतदारसंघाची त्यांच्यावर जबाबदारी आहे. आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीत सातारामधून तेच उमेदवार असतील, याची पक्ष पातळीवर घासाघीस होऊन सारंग पाटील यांनी माघार घेतली.त्यांच्या माघारीमुळे राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

अरुण लाड (सांगली), भैया माने (कोल्हापूर) , बाळराजे पाटील (सोलापूर) , उमेश पाटील (सोलापूर), संजीवराजे निंबाळकर (सातारा) यांच्यासह डझनभर इच्छुक आहेत. भाजपकडून मात्र अद्याप सावध भूमिका असून, मतदार नोंदणीतून शेखर चरेगावकर (सातारा), माणिक पाटील-चुयेकर (कोल्हापूर), माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसन्नजित फडणवीस (पुणे), खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट (पुणे) यांनी तयारी केली आहे.

आगामी सर्वच निवडणुका दोन्ही कॉग्रेस व शिवसेना एकत्रित लढणार आहेत. आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीला जाणार असून येथे भाजपला पराभूत करण्यासाठी कॉग्रेस व शिवसेना ताकदीने मागे राहणार आहेत; त्यामुळे येथे विजयापेक्षा आघाडीच्या उमेदवारीसाठीच सर्वस्व पणाला लागले आहे.

लाड, माने यांच्यात उमेदवारीसाठी चुरस

क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड व कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्यात राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी चुरस रंगणार आहे. लाड यांनी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार; तर माने यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून दोन्ही नेते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यातही माने हे गेली २५ वर्षे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत; त्यामुळे शेवटच्या टप्प्यात माने यांनी बाजी मारली तर नवल वाटायला नको.

Web Title: A handful of aspirants to the NCP for graduates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.