‘सरल’ ठरतेय शाळांसाठी अडथळ्यांची शर्यत

By admin | Published: August 13, 2015 10:36 PM2015-08-13T22:36:04+5:302015-08-14T00:16:05+5:30

मुदत वाढविण्याची मागणी : सुविधांच्या अनुपलब्धतेमुळे आॅनलाईन डाटा करताना मुख्याध्यापकांसह शिक्षकांची त्रेधातिरपीट

Handicap race for 'simple' schools | ‘सरल’ ठरतेय शाळांसाठी अडथळ्यांची शर्यत

‘सरल’ ठरतेय शाळांसाठी अडथळ्यांची शर्यत

Next

अशोक खाडे -कुंभोज   सरल स्कूल डाटाबेस माहिती १५ आॅगस्टपूर्वी आॅनलाईन भरण्याची लगीनघाई संपूर्ण राज्यभर एकाचवेळी सुरू असताना शाळा पातळीवर या कामासाठी आवश्यक सुविधांचा अभाव, तज्ज्ञ शिक्षकांची उणीव, वेळखाऊ माहिती संकलन तसेच इंटरनेट सुविधेत निर्माण होणाऱ्या व्यत्ययामुळे सरलच्या कामात अडथळ्यांची शर्यंत पार करताना प्राथमिक शिक्षकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. सरल माहिती भरण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी शाळांकडून होत आहे.
अलीकडे शाळा पातळीवर मिळणारे सर्व प्रकारचे अनुदान रेकॉर्ड, शिष्यवृत्ती फॉर्म, शालेय पोषण रेकॉर्ड, आदी कामांची माहिती आॅनलाईन झाली आहे. याशिवाय शिक्षकांच्या पगारासाठी शालार्थ प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या सर्व प्रक्रियेची भिस्त थेट मुख्याध्यापकांवर टाकल्यामुळे आॅनलाईन पद्धत अद्यापही पचनी न पडलेले मुख्याध्यापक अक्षरश: सैरभैर झाले आहेत. याकामी कोणतीही कुचराई क्षम्य नसल्याने मुख्याध्यापक सातत्याने तणावाखाली वावरताना दिसत आहेत. त्यातच सरल डाटाबेस योजनेंतर्गत शाळा, विद्यार्थी तसेच शिक्षकांची माहिती इत्यंभूतपणे आणि तीही मुदतीत आॅनलाईन भरावयाची आहे. विहीत मुदत संपण्यास केवळ चार दिवस उरल्याने मुख्याध्यापकांसह शाळेतील जबाबदार शिक्षकांच्या पायी अक्षरश: भिंगरी आली आहे. कुठे संगणक आहे, तर कुठे नाही. असेल तर सुस्थितीत असेलच असे नाही. अपवाद वगळता बहुतेक शाळांत इंटरनेटची जोडणी नाही आणि सर्व असेलच तर संगणक व इंटरनेट हाताळण्यात तरबेज शिक्षकांची वानवा आहे. अशा दळभद्री अवस्थेत ही कामे करताना शिक्षकांचे लक्ष शाळेपासून आपसूकच विचलित होत आहे. परिणामी, या कालावधीत शाळांतील शैक्षणिक वातावरणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. सरल माहिती भरण्याच्या वेबसाईटचे नूतनीकरण करण्याची कामे मुदत संपत आली, तरी सुरूच असल्याने प्रामुख्याने अधिक तर विद्यार्थी माहितीचे काम अपूर्णावस्थेत आहे. शाळांना ही कामे पदरमोडीतून करावी लागत आहेत. सुविधांच्या उपलब्धतेचा विचार न करता वेळखाऊपणाचे हे काम करताना इंटरनेटची सुविधा नसणारे तसेच इंटरनेट वापरण्यास न येणारे मुख्याध्यापक व शिक्षक माहितीच्या कागदांचे भेंडोळे घेऊन पै-पाहुणे, मित्रमंडळी, सहकारी शिक्षकांच्या घरी येरझाऱ्या घालत आहेत. आॅनलाईन प्रक्रिया शाळा, शिक्षक तसेच एकूणच शैक्षणिक क्षेत्रासाठी हिताची असल्याने त्रास सोसूनही आॅनलाईन कामांच्या पूर्ततेसाठी शाळांनी याकामी वाहून घेतल्याचे चित्र आहे.


ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा सुरळीत मिळत नसल्याने सरल प्रणालीअंतर्गत आॅनलाईन माहिती भरण्यास वेळ लागत आहे. शिक्षक माहितीस ३१ आॅगस्ट, तर विद्यार्थी माहितीस ३० सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक संघटनेमार्फत राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.
- प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष, पुरोगामी शिक्षक संघटना

गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी
जिल्हा परिषदेच्या शाळांना आॅनलाईन प्रक्रियेशी जुळवून घेणे अद्यापही जड जात आहे. पर्यायाने प्राथमिक शिक्षकांनी केवळ आॅनलाईन कामापुरतेच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रातील एकूण बदल स्वीकारण्याची तत्परता अंगी बाळगल्यास हलक्याफुलक्या कामांनी गांगरून न जाता समर्थपणे सामोरे जाणे शक्य होईल. त्याचबरोबर शिक्षकांना शाळांसह स्वत:कडील गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळेल.

Web Title: Handicap race for 'simple' schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.