अपंगांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर गोंधळ

By admin | Published: December 6, 2015 12:58 AM2015-12-06T00:58:41+5:302015-12-06T01:36:22+5:30

अपंगाचे पेन्शन प्रकरण : काही काळ तणाव; प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे आंदोलन

Handicapped out of District Collector's House | अपंगांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर गोंधळ

अपंगांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर गोंधळ

Next

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील आंबेवाडी येथील सात अपंगांची तलाठ्यांनी चुकीची माहिती दिल्याने पेन्शन बंद करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अपंगांचे आंदोलन सुरू असून त्याची कोणीच दखल न घेतल्याने शनिवारी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. बैठकीत ठोस निर्णय न झाल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या दोन महिला व दोन पुरुषांना ताब्यात घेतले.
चंदगड तालुक्यातील जोतिबा गोरल, पांडुरंग पाटील, पांडुरंग गुडवलेकर, अण्णापा गोरल, ओमाण्णा पाटील, ललिता जाधव, यल्लव्वा नाईक या सात अपंगांची पेन्शन तलाठ्यांनी चुकीची माहिती दिल्यामुळे थांबविण्यात आली आहे. ही पेन्शन पुन्हा चालू करण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. मात्र त्याची कोणीच दखल घेत नसल्याने आंदोलकांनी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन आंदोलनात लक्ष घालण्याची विनंती केली.
शनिवारी दुपारी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी ज्या दिवसापासून या आंदोलकांची पेन्शन बंद करण्यात आली आहे, ती पुन्हा चालू करावी व हे सर्व करण्यास कारणीभूत असणारे तलाठी, सर्कल आणि तहसीलदार यांना निलंबित करावे अशा मागण्या केल्या. चर्चेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करू, असे आश्वासन दिले होते. मात्र आंदोलकांनी ठोस लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही अशी भूमिका घेत दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करून शंखध्वनी करण्यास सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे हे लक्षात येताच प्रशासनाच्या वतीने जादा पोलीस कुमक मागविण्यात आली. पोलिसांनी हे आंदोलन उधळवून लावून आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये जोरदार झटापटही झाली. अखेर पोलिसांनी संजय पवार व नारायण मडके यांना उचलून नेऊन गाडीत बसवले.
प्रशासनाच्या वतीने गडहिंग्लज येथील अधिकारी चौकशीसाठी नियुक्त केले जातील, असे लेखी आश्वासन देण्यात आले. मात्र ती मागणी मान्य नसल्याने आंदोलनकर्त्यांनी ते पत्र स्वीकारले नाही. आंदोलनात प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे अध्यक्ष देवदत्त माने, विकास चौगुले, नारायण मडके, युनूस शेख, विनायक सुतार, विजय शिंदे, रूपाली पाटील, श्रद्धा माने, सुरेश ढेरे, आदी उपस्थित होते.
चार आंदोलकांवर कारवाई
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी दुपारी चारच्या सुमारास आंदोलनावेळी पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या चौघा आंदोलकांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित आरोपी नारायण तुकाराम मडके (रा. मादळे, ता. करवीर), संजय बाबूराव पोवार (रा. पिरवाडी, ता. करवीर), कल्पना सखाराम वावरे (रा. कसबा बावडा), सुजाता सर्जेराव जाधव (रा. वाशी, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत.
सकाळी सत्कार, दुपारी हेळसांड...
जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने प्रहार अपंग क्रांती आंदोलन व पॅरॉलिम्पिक स्पोर्टस् असोसिएशन यांच्यातर्फे शनिवारी सकाळी संजय पवार यांनी अपंगांसाठी केलेल्या कार्याबद्दल विशेष सत्कार झाला. मात्र, सायंकाळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेताना उचलून गाडीत कोंबले. यामुळे ‘सकाळी सत्कार व दुपारी हेळसांड’ असा अनुभव पवार यांना आला. (प्रतिनिधी)

Web Title: Handicapped out of District Collector's House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.